Thursday, 5 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०५ सप्टेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातली पहिली बैठक मुंबईत काल झाली. यात मित्र पक्षांना कोणत्या जागा देता येतील, यावर प्रामुख्यानं चर्चा झाली. विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कोणत्या पक्षानं किती जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेलं नसल्याची माहिती भाजपच्या एका नेत्यानं पीटीआय वृत्त संस्थेला दिली आहे.
***

 मुंबई इथं सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेनं काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द केल्या आहेत. आज धावणाऱ्या जालना - दादर जनशताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून आज रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी मुंबई ते सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस मुंबईहून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

 सांगली जिल्ह्यातल्या कोयना आणि वारणा धरणातल्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणी साठ्याची क्षमता संपली असुन धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. वारणा धऱण परिसरात पावसाचा जोर वाढला असून हे धरण शंभर टक्के भरलं आहे.

 दरम्यान, नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प पूर्णपणे भरल्यानंतर आजपासून शहराला दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड शहरात आतापर्यंत सहा दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.
***

 ऑनलाईन पध्दतीनं शिक्षक सेवक भरती करण्याचा राज्याचा उपक्रम अन्य राज्यांसाठीही पथदर्शी ठरेल, असं शालेय‍शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या राज्यातल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
*****
***

No comments: