Thursday, 5 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 राष्ट्रनिर्माणामध्ये शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असून, शालेय जीवनातच चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया सुरु होते, शिक्षकांबद्दलचा आदर हा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा आधार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. शिक्षकांनी आपल्या मूळ जबाबदाऱ्या ओळखाव्यात असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं आहे. 

 शिक्षक दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. देशभरातल्या एकूण ४६ शिक्षकांना यावेळी राष्ट्र्पतींच्या हस्ते गौरवण्यात आलं.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं पाचव्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या खुल्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंजो अबे तसंच मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांच्या बरोबर स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा केली. मोदी आज तिथल्या विद्यापीठ परिसरात भारतीय व्यापार दालनालाही भेट देणार आहेत. भारत-रशिया विसाव्या वार्षिक शिखर परिषदेत त्यांनी पुतीन यांच्या बरोबर व्यापक चर्चा केली. भारत-रशिया सहकार्याच्या नव्या क्षितीजाचा शोध घेण्याचा या बैठकीचा उद्देश असून, व्यापार, सुरक्षा, सागरी सहकार्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एकत्रितपणे काम करणं यांचा यात समावेश आहे.
****

 मुंबई, ठाणे, आणि नवी मुंबई परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसानं काल रात्रीपासून उसंत घेतली आहे. उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाल्यामुळे जनजीवन हळुहळु पूर्वपदावर येत आहे. विविध रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी मध्यरात्री विशेष गाड्या सोडण्यात आल्या. गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगरमधे विजेंद्र बागडी आणि जगदीश परमार या मुंबई महानगरपालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा पाण्याच्या वेढ्यात बुडून मृत्यू झाला. आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून, मुंबई आणि आसपासच्या परिसरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****

 लातूर जिल्ह्यात आज सकाळ पर्यंत एकूण सुमारे ३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी सुमारे चार टक्के असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक समारे नऊ मिली मीटर पाऊस निलंगा तालुक्यात झाला असून, देवणी तालुक्यात सर्वात कमी सुमारे अर्धा मिली मीटर पाऊस झाला आहे. तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात अद्याप पावसाची नोंद झालेली नाही.
****

 धुळे जिल्ह्यातले बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. अशा परिस्थितीतीत पावसामुळे नदींना पूर येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगत सतर्क  रहावं, असं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केलं आहे. वेध शाळेनं मध्यम स्वरुपाचा पाऊस किंवा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सतर्क असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, करवंद, वाडीशेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर अमरावती प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा झाला आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून नकाणे तलाव भरण्यात येत आहे, तर डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकानं कारवाई करत शिर्डी राहुरी महामार्गाजवळ  देवळाली प्रवरा इथं छापा मारून चोरून वाहतूक करताना दोन चारचाकी वाहनांसह सुमारे एकोणीस लाख बावन्न हजार रुपये किमतीचं विदेशी मद्य काल जप्त केलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे .
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या कुरणपुर इथल्या देठे वस्तीजवळ दहा वर्षाच्या एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली. बिबट्यानं केलेल्या हल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला लोणी इथल्या दवाखान्यात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. दर्शन चंद्रकांत देठे असं या मुलाचं नाव आहे. तो एका नातेवाईकासोबत शेतातून जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला होता.
*****
***

No comments: