Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक
सरकार मिळाल्याचा पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा दावा
** भारतीय
जनता पक्षाच्या सरकारनं राज्यातले उद्योग, कारखानदारी, सहकार आणि शेतकऱ्यांना संपवण्याचं
काम केल्याचा राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचा आरोप
** जागावाटपाबाबत पुनर्विचार झाल्यास
एम आय एम आणि वंचित बहुजन
आघाडीची युती अजुनही शक्य - प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज
जलील
** मराठवाड्यात
काल अनेक भागात चांगला पाऊस
आणि
** मराठवाड्यात महावितरणची एका दिवसात पावणे सहा कोटी रूपयांची थकबाकी वसूल
****
राज्यात
गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक सरकार मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप,
आणि विजय संकल्प मेळाव्यात काल ते बोलत होते. राज्यात गेल्या पाच वर्षात गुंतवणूकीला
पोषक वातावरण मिळालं, कायदा सुव्यवस्थेत सुधारणा झाली, सामाजिक समता, तसंच सांस्कृतिक
सभ्यतेला मान मिळाल्याचं सांगत, पंतप्रधानांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
कामाचं कौतुक केलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, आपल्या पाच वर्षाच्या
कामांचा आढावा घेतला.
****
भारतीय
जनता पक्षाच्या सरकारनं राज्यातले उद्योग, कारखानदारी, सहकार आणि शेतकऱ्यांना संपवण्याचं
काम केलं, असा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
ते काल नांदेड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अशा सरकारला सत्तेच्या बाहेर काढण्याचं
काम आजच्या तरुण पिढीचं आहे, असं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी खासदार गंगाधर कुंटुरकर यांच्यासह अनेक
मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.
पवार यांनी
काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. परभणी जिल्हा
परिषदेच्या इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरणही
पवार यांच्या हस्ते झालं.
****
राज्य
महिला आयोग बचत गटांच्या महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान हाती घेणार आहे. यामध्ये
राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून, महिलांना, विशेषतः ग्रामीण महिलांना,
डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष
विजया रहाटकर यांनी सांगितलं. त्या काल मुंबईत बोलत होत्या. या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली, महिलांमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात
येणार आहे.
****
राज्यातल्या
निरीक्षण गृह तसंच बालगृहातल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारित वेतनश्रेणी
लागू करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतनातला फरक देण्यात येणार असल्याचं,
मुंडे यांनी सांगितलं.
****
जागा वाटपाबाबत पुनर्विचार झाल्यास, अखिल भारतीय
मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमिन -एम आय एम वंचित बहुजन आघाडीशी अजुनही युती करण्यास तयार
असल्याचं, प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. आघाडीचे नेते आपल्याशी चर्चा करण्यास तयार नसतील, तर त्यांनी पक्षाध्यक्ष
असदुद्दीन ओवैशी यांच्याशी चर्चा करावी, मात्र केवळ आठ जागा देण्याच्या निर्णयावर युती
अशक्य असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रीय
मराठा पार्टी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश
पाटील होणाळकर, यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सात उमेदवारांची
पहिली यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. होणाळकर स्वत: लातूर जिल्ह्यातल्या निलंगा
मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी हेलीकॉप्टर हे
चिन्ह मिळालं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मराठवाड्यात
काल अनेक भागात चांगला पाऊस झाला.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या आठ आणि लातूर जिल्ह्यातल्या एका महसुली मंडळात, अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद शहरात दुपारच्या
सुमारास काही वेळ मुसळधार
पाऊस झाला तर दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. परभणी शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश
ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
मराठवाड्यात
महावितरणच्या वीजदेयक थकबाकी वसूली मोहिमेअंतर्गत काल एका दिवसात ४२२ वीज
ग्राहकांनी पाच कोटी ७५ लाख
२६ हजार रूपयांच्या थकबाकीचा भरणा केला. अनेकवेळा नोटिसा, सूचना देऊनही दखल न घेणाऱ्या १२० ग्राहकांचा
वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करून त्यांचे मीटर, वायर काढण्यात आले. तर ७०७ ग्राहकांचा
वीज पुरवठा तात्पुरता खंडित केला असल्याचं महावितरणच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****
अंबाजोगाई
इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती
राज्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना काल माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मधुकर भावे हे महाराष्ट्रातला गेल्या साठ वर्षाचा
चालता बोलता ज्ञानकोष असल्याचे गौरवोद्गार कदम यांनी यावेळी काढले. नेत्यांनी राजकारणात
पळापळ न करता, आहे त्या जागेवर स्थीर उभं राहण्याचा सल्ला भावे यांनी यावेळी दिला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.
२५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
No comments:
Post a Comment