आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ ऑक्टोबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन
करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर तसंच संसद भवनात गांधीजींना पुष्पांजली
अर्पण केली. गांधीजी हे जगासाठी आदर्श होते, आणि त्यांनी सर्वांना धार्मिक ऐक्य, अस्पृश्यता
निवारण आणि महिलांची उन्नती करण्याचा मार्ग दाखवला, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
गांधी जयंतीनिमित्त एका संदेशात म्हटलं आहे. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सलोखा, नैतिकता
आणि साधेपणा या तत्त्वांचा अंगिकार केला पाहिजे, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान लाल बहादूर
शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी विजय घाट इथं जाऊन शास्त्रीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.
****
काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी
जाहीर केली असून यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच माजी मुख्यमंत्री दिवंगत
विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख यांचा समावेश आहे. चव्हाण यांना
दक्षिण कराडमधून आणि धिरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी
सत्तावीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
दरम्यान, भाजप
उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नसल्यानं नाराज झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी
काल जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या गावा-गावांत कलापथकाच्या माध्यमातून
मतदार जनजागृती केली जाणार आहे. शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या पथकाद्वारे ही जनजागृती
केली जाणार असून, जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत काल या पथकाचा
शुभारंभ झाला.
****
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात विशाखापट्टनम इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment