Wednesday, 2 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२  ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली इथून भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी गांधी संकल्प यात्रेला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. पक्षाचे कार्यकर्ते आजपासुन ३१ ऑक्टोबर पर्यंत देशभरात पदयात्रा करुन गांधीजीच्या स्वदेशी, स्वधर्म या मुल्यांचा प्रसार प्रत्येक गावात करणार असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं.  गांधीनी जगाला सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवत स्वांतत्र्य प्राप्त केल्याचं ते म्हणाले. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीक वस्तुंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही अमित शाह यांनी  यावेळी केलं.

 दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या 'गांधी संदेश पदयात्रे'चं नेतृत्व केलं. आज दिल्ली इथल्या कॉंग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यात्रेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहुन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.
****

 काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली असून यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा तसंच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख यांचा समावेश आहे. चव्हाण यांना दक्षिण कराडमधून आणि धिरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, अंधेरीतून जगदीश अमीन, दहिसरमधून अरुण सावंत, शिवडीतून उदय फणसेकर यांनाही काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आहे.
  
 दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी सत्तावीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात माहीम मधून नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
****

 भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नसल्यानं नाराज झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला असून खडसे यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
****

 बीड जिल्ह्यात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या श्री क्षेत्र सावरगाव इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेश मधून सुमारे दहा लाख भाविक या दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड या मेळाव्याच्या संयोजन समितीचे प्रमुख आहेत. 
****

 उस्मानाबाद इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातल्या तुळजाभवानी क्रीडा संकुलावर  मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरी मध्ये उस्मानाबाद शहरातील २३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
****

 वाशिम इथं मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून या अंतर्गत आज महात्मा गांधी जयंती निमित्त 'सायक्लोथॉन'चं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक या उपक्रमाला उपस्थित होते.
****

 दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा अविनाश साबळे पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून असं यश मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. राज्यातील मांडवा इथला रहिवासी असलेल्या अविनाशनं आठ मिनिटं पंचवीस सेकंद आणि तेवीस मिलीसेकंदात हे अंतर पार करताना स्वत:चाच आठ मिनिटं अठ्ठावीस सेकंद चौऱ्यान्नव मिलिसेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. भारताच्या अन्नू राणीला मात्र महिलांच्या भालाफेकमध्ये पात्रता फेरीतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अंतिम फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
****
 भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात विशाखापट्टनम इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना दमदार सुरूवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या नाबाद अर्धशतकांमुळे ३९ षटकांत बिनबाद १२३ धावा केल्या आहेत.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...