Thursday, 3 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.10.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०३ ऑक्टोबर २०१९  सकाळी ७.१० मि.
**** 

v विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे १४, काँग्रेस- २०, राष्ट्रवादी काँग्रेस ७७ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणखी ४५ उमेदवार जाहीर
v बीड जिल्ह्यात केजमधून नमिता मुंदडा भाजपच्या तर, औरंगाबाद जिल्ह्यात प्रभाकर पालोदकर सिल्लोडमधून काँग्रेसचे उमेदवार. प्रदीप नाईक, विजय भांबळे, राजेश टोपे, चद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घोषित
v औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे  माजी  आमदार  अण्णासाहेब  माने, पैठण आणि कन्नडचे माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
v एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून २०२२ पर्यंत देशाला मुक्त करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
आणि
v दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या बिनबाद २०२ धावा
****

 विधानसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पक्षानं १४ उमेदवारांची, काँग्रेसनं २० उमेदवारांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल ७७ उमेदवारांची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.

 भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत काल बीड जिल्ह्यातल्या केज मतदारसंघातून नमिता मुंदडा, लातूर शहर - शैलेष लाहोटी, तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****

 काँग्रेसनंच्या दुसऱ्या यादीत औरंगाबाद पश्चिम मधून रमेश गायकवाड, सिल्लोड - प्रभाकर पालोदकर, तर परभणी मधून रविराज अशोकराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून, प्रवक्ते नवाब मलिक यांना मुंबईतल्या अणुशक्ती नगरमधून तर बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी दिली आहे. 

 नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप नाईक, लोहा - दिलीप धोंडगे, वसमत - चंद्रकांत नवघरे, जिंतूर - विजय भांबळे, घनसावंगी - राजेश टोपे, बदनापूर  -बबलू चौधरी, भोकरदन - चद्रकांत दानवे, गेवराई - विजयसिंह पंडित, माजलगाव - प्रकाश सोळंके, बीड - संदीप क्षीरसागर, केज - पृथ्वीराज साठे, परळी - धनंजय मुंडे, अहमदपूर - बाबासाहेब पाटील, उदगीर - संजय बनसोडे, तर परांडा मतदारसंघातून राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मतदारसंघातून संतोष जाधव, फुलंब्री - अमर देशमुख, नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे, परभणी - सचिन पाटील, गंगाखेड - विठ्ठल जवादे, परतूर - प्रकाश सोलंकी, बीड - वैभव काकडे, औसा - शिवकुमार नगराळे, तर किनवट मतदारसंघातून विनोद राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.
****

 एमआयएम पक्षानं काल लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर - उदगीर  मतदारसंघातून सय्यद ताहेर हुसैन मोईनुद्दीन, पुण्यातल्या हडपसर मतदार संघातून जाहीद इब्राहिम शेख, आणि मिरज सांगली या अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून आयेशा मोहम्मद काझी यांना उमेदवारी जाहीर केली.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरचे  शिवसेनेचे  माजी  आमदार  अण्णासाहेब  माने यांनी काल मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माने यांचे पुत्र संतोष माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पैठणचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे, आणि कन्नड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे युवा नेते संतोष कोल्हे यांनीही काल आपल्या १६ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****

 लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजपने अभिमन्यू पवार यांना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काल शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल औसा इथं  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी अडवून भूमिपुत्राला न्याय द्यावा अशी मागणी केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातूनही रमेश कराड यांना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी लातूर इथंही पालकमंत्र्यांची गाडी अडवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 हिंगोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदार संघात युती आणि आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. मात्र, या पार्श्र्वभूमीवर मित्र पक्षांतल्या अनेक इच्छुकांमध्ये असंतोष असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्लीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद इथं जाहीर सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारच्या धोरणांवर टीका केली.
****

 किसानसभा आणि शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी प्रश्र्न निवडणुकीतील मुख्य मुद्दे व्हावे यासाठी `मी शेतकरी` अभियानाला कालपासून राज्यभरात प्रारंभ झाला. परभणी जिल्ह्यात शेतकरी कार्यकर्त्यांनी पारावर ठिय्या मांडून या अभियानाची सुरुवात केली.
****

 लातूर जिल्ह्यात काल मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची संदेश फेरी काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी केलं.
****

 विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उस्मानाबाद इथं तुळजाभवानी क्रीडा संकुलावर मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. उस्मानाबाद शहरातल्या २३ शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालयातले विद्यार्थी आणि शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून २०२२ पर्यंत देशाला मुक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त काल गुजरातमध्ये अहमदाबाद इथं स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात बोलत होते. देश प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी स्वत:च्या सवयीत बदल करणं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साधेपणाच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला. देशातल्या प्रत्येक नागरिकाने देशासाठी एक संकल्प करून पुढच्या वर्षभरात तो सिद्धीस नेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी गांधी संकल्प यात्रेला काल नवी दिल्लीतून प्रारंभ झाला. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संकल्प यात्रेत, येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत देशभरात पदयात्रा करुन गांधीजीच्या स्वदेशी, स्वधर्म या मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे. फक्त एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अमित शाह यांनी यावेळी केलं.

 दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या 'गांधी संदेश पदयात्रे'चं काल नेतृत्व केलं. काल दिल्ली इथल्या कॉंग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यात्रेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधीजींना अभिवादन केलं.
****

 मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केलं. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडसह सर्वच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड स्थानकामध्ये विशेष स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला.

 संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नांदेड, परभणी, जालना, तसंच औरंगाबाद रेल्वे स्थानकांवरचा प्लास्टिकचा कचरा गोळा करून रेल्वे स्थानकं स्वच्छ केली. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारं पथनाट्य सादर करण्यात आलं. 
****

 भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेआधी थांबवावा लागला. दिवसअखेर भारताच्या बिनबाद २०२ धावा झाल्या. रोहीत शर्मा ११५ आणि मयंक अग्रवाल ८४ धावांवर खेळत आहे.
****

 प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं पर्यावरणपूरक कापडी पिशवी बँकेची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम देशातल्या ७५० जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी यावेळी सांगितलं.
त्या म्हणाल्या...

 रि-सायकल फॉर लाईफ सायकल, असं लक्ष्यामध्ये घेऊन आम्ही कामाची सुरवात करतो आहोत. आणि या सगळ्या ७५० जिल्ह्याच्या मध्ये पर्यावरण पूरक कापडी पिशव्याची ब्याग बँक आम्ही तयार करतो आहोत. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही लगेचचं, या कापडी ब्यागांचे ए.टि.एम. सुद्धा सुरू करणार आहेत. अतिशय नाममात्र मुल्यामध्ये या एटिएम मधून आपल्याला बाजारामधे मुख्य ठिकाणी रेल्वे स्थानक आहे किंवा बस स्थानक आहे. अश्या ठिकाणी आपल्याला ह्या कापडी ब्यांगा मिळू शकतील.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...