Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची दुसरी आज जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कन्नड मतदार संघातून संतोष कोल्हे, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मतदार
संघातून डॉ मधुसूदन केंद्रे, बीड जिल्ह्यातल्या आष्टी मतदार संघातून बाळासाहेब आजबे,
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदार संघातून पंकज भुजबळ जळगाव शहर मतदार संघातून अभिषेक
पाटील, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. अहेरी मतदार संघातून काँग्रेस पक्षानेही दीपक आत्राम यांना उमेदवारी
दिलेली आहे.
****
भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या
आठवले गटानं, सातारा जिल्ह्यातल्या फलटण मतदार संघातून दीपक निकाळजे यांना उमेदवारी
दिली आहे. दीपक हे कुख्यात गुंड छोटा राजनचे भाऊ आहेत. भारिप आठवले गटाला महायुतीच्या
जागावाटपात सहा जागा मिळाल्या आहेत. दीपक निकाळजे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे
कार्यकर्ते आहेत, त्यांनी या पूर्वी मुंबईतल्या चेंबूर मतदार संघातून भारिप कडून निवडणूक
लढवली आहे. फलटणसोबत, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव, परभणी जिल्ह्यातल्या पाथरी, मुंबईतल्या
मानखुर्द, सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, आणि भंडारा मतदार संघातून आठवले गट निवडणूक
लढवणार आहे.
****
भारतीय जनता पक्षानं
१४ उमेदवारांची, काँग्रेसनं २० उमेदवारांची,
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ४५ उमेदवारांची यादी काल जाहीर केली. भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत केज
मतदारसंघातून नमिता मुंदडा, लातूर शहर - शैलेश लाहोटी, तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून
अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसनंच्या दुसऱ्या यादीत औरंगाबाद पश्चिम
मधून रमेश गायकवाड, सिल्लोड - प्रभाकर पालोदकर, तर परभणी मधून रविराज अशोकराव देशमुख
यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप नाईक, जिंतूर - विजय भांबळे,
घनसावंगी - राजेश टोपे, गेवराई - विजयसिंह पंडित, माजलगाव - प्रकाश सोळंके, बीड - संदीप क्षीरसागर, केज
- पृथ्वीराज साठे, तर परळीतून - धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी
अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपते आहे, या पार्श्वभूमीवर आज अनेक उमेदवार विविध
मतदार संघातून अर्ज भरण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातल्या परळी
मतदार संघातून धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीच्या वतीने
चार उमेदवारी अर्ज दाखल केले. आपण कोणालाही पराभूत करण्यासाठी नव्हे तर गेल्या पाच
वर्षात परळीचा खुंटलेला विकास पुन्हा नव्याने सूरू व्हावा यासाठी लढत असल्याचं, मुंडे
यांनी सांगितलं.
सांगली जिल्ह्यातल्या
इस्लामपूर मतदार संघातून भाजपचे निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज
आज दाखल केला. जागावाटपात ही जागा शिवसेनेला सुटली आहे.
शिवसेना नेते आदित्य
ठाकरे आज मुंबईतल्या वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. वरळी इथं शक्तिप्रदर्शन
करून ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी हिरामण माळी यांना पाच हजार रुपये लाच घेतांना अटक केली.
एका विद्यार्थ्याचा एका महाविद्यालयातला अकरावी प्रवेश रद्द करून, दुसऱ्या महाविद्यालयात
प्रवेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात माळी याने, लाच मागितली होती. त्या विद्यार्थ्यानं
दिलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
****
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान
व्यवस्थापन समितीचे विद्यमान सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष
सुभाष वोरा यांचं काल अल्पशा आजाराने कोल्हापुरात निधन झालं, आज सकाळी त्यांच्या पार्थिव
देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वोरा यांनी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी
समिती सभापती असताना, मोफत अंत्यसंस्कार ही संकल्पना देशात प्रथम अंमलात आणली, वोरा
यांचे अंत्यसंस्कारही याच संकल्पनेतून झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण आफ्रिका आणि भारत
यांच्यात विशाखापट्टणम् इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर
भारतानं आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दोन बाद ३३७ धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा १७६ धावांवर तर चेतेश्वर पुजारा सहा धावांवर बाद झाला.
*****
***
No comments:
Post a Comment