Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –04 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा
आज शेवटचा दिवस; काल एका दिवसात एक हजार ४२३ उमेदवारांचे
अर्ज दाखल
** सर्व पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन; भारतीज जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांचे उर्वरित जागांवरचे
उमेदवार घोषित
** राष्ट्रवादी काँग्रेस,
काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार- जयंत
पाटील
आणि
** विशाखापट्टनम क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात तीन बाद ३९ धावा
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभर जवळपास सर्वच विधानसभा
मतदारसंघात अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यात
विविध मतदारसंघांमध्ये काल एक हजार ४२३ उमेदवारांनी एक हजार ९६९ उमेदवारी अर्ज दाखल
केल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितलं. उर्वरित उमेदवार
आज आपले अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदार संघांत काल एकूण तीनशे सत्तावन्न उमेदवारी अर्ज
दाखल झाले. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे
अब्दुल गफ्फार कादरी, फुलंब्री मतदार संघातून महायुतीचे हरिभाऊ बागडे तर महाआघाडीचे
कल्याण काळे, औरंगाबाद मध्य मतदार संघातून भाकपचे अभय टाकसाळ, एमआयएमचे नासेर सिद्धिकी,
औरंगाबाद पश्चिममधून महायुतीचे संजय शिरसाट तर वैजापूरमधून महायुतीचे विजय बोरनारे
यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी
मतदारसंघातून भाजपचे मोहन फड, परभणीतून शिवसेनेचे राहुल पाटील, गंगाखेडमधून शिवसेनेचे
विशाल कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसुदन केंद्रे, जिंतूर - सेलुमधून राष्ट्रवादी
काँग्रेसचे विजय भांबळे, तर समाजवादी पक्षाचे दिलावर जमालसाब यांनी काल उमेदवारी अर्ज
दाखल केले.
जालना जिल्ह्यातल्या परतूर
मतदार संघातून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल, घनसावंगीतून राष्ट्रवादी
काँग्रेसचे राजेश टोपे तर शिवसेनेचे हिकमत उढाण, भोकरदनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे
चंद्रकांत दानवे तर बदनापूरमधून रुपकुमार चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
बीड जिल्ह्यात परळीतून महायुतीच्या
पंकजा मुंडे तसंच महाआघाडीचे धनंजय मुंडे, बीडमधून महायुतीचे जयदत्त क्षीरसागर, यांनी
आपला उमेदवारी अर्ज भरला.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर
मतदार संघातून महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर, हदगावमधून महायुतीचे नागेश पाटील आष्टीकर,
किनवटमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष नाईक, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेच्या राजश्री
पाटील, नायगावमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण, यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
लातूर शहर मतदार संघातून महाआघाडीचे
अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
उमरगा मतदार संघातून महायुतीचे ज्ञानराज चौगुले, तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे
मधुकर चव्हाण, तर महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील, परंडातून महायुतीचे तानाजी सावंत,
तर आघाडीचे राहुल मोटे, उस्मानाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी आपले
उमेदवारी अर्ज दाखल केले.
हिंगोली जिल्ह्यात वसमतमधून
महायुतीचे जयप्रकाश मुंदडा, कळमनुरीतून महायुतीचे संतोष बांगर, तर राष्ट्रीय काँग्रेस
पक्षाचे संतोष टार्फे, वसमतमधून शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे
चंद्रकांत नवघरे, हिंगोलीमधून काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपले उमेदवारी
अर्ज दाखल केले.
लोकसभेच्या सातारा पोटनिवडणुकीसाठी
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे श्रीनिवास पाटील यांनीही काल उमेदवारी अर्ज
दाखल केला.
****
शिवसेना नेते आदित्य ठाकरे
यांनी काल वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर मधून महायुतीचे दिलीप
माने, महाआघाडीच्या प्रणिती शिंदे, उत्तर सोलापूर मधून महायुतीचे विजय देशमुख, दक्षिण
सोलापूरमधून महायुतीचे सुभाष देशमुख, पंढरपूर इथून राष्ट्रवादीचे भारत भालके तसंच शिवसेनेच्या
बंडखोर शैला बोरसे, कराड उत्तर मतदार संघातून महाआघाडीचे पृथ्वीराज चव्हाण तर महायुतीचे
डॉ अतुल भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी मतदार संघातून महायुतीचे शिवाजी कर्डिले,
अकोले मतदारसंघातून महायुतीचे वैभव पिचड, कर्जत जामखेड मधून महाआघाडीचे रोहित पवार,
सातारा विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे दीपक पवार, सांगलीतून महायुतीचे सुरेश खाडे,
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदार संघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी तर जामनेर मतदार संघातून
महायुतीचे गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, प्रहार जनशक्ती तसंच रिपब्किन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं काल उर्वरित
मतदार संघातल्या उमेदवारांची नावं घोषित केली.
भारतीय जनता पक्षानं चौथी
यादी जाहीर केली. यात शिरपूरमधून काशिराम पवार, रामटेक - मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली
- परिणय फुके, तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेशसिंग ठाकुर यांना उमेदवारी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा
निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नाही, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
ते काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं कार्यकर्त्यांशी बोलत होते. पक्ष जो निर्णय
घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं
२० उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मतदार
संघातून संतोष कोल्हे, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधून डॉ मधुसूदन केंद्रे, बीड जिल्ह्यातल्या
आष्टीमधून बाळासाहेब आजबे, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून पंकज भुजबळ, जळगाव शहर
- अभिषेक पाटील, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम,
यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहेरी मतदार संघातून काँग्रेस पक्षानेही दीपक आत्राम
यांना उमेदवारी दिलेली आहे.
****
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार
जनशक्ती पक्षानंही काल २५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद पश्चिमसाठी
प्रदीप त्रिभुवन, औरंगाबाद पुर्व - शिवप्रसाद पगार, सिल्लोड - सोयगाव
- अनिल पालोदे, फुलंब्री - सुधाकर शिंदे, वैजापूर - ज्ञानेश्वर
घोडके, पैठण - जयाजीराव सुर्यवंशी, उत्तर नांदेड - संदीप पांडे, तर हिंगोली विधानसभा
मतदारसंघातून विजय राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
भारतीय रिपब्लीकन पक्ष आठवले
गट महायुतीत विधानसभेच्या सहा जागा लढवत असून, काल त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड, माळशिरस - विवेक गुजर, फलटण
- दिगंबर आगाव, नायगाव - राजेश पवार, भंडारा - अरविंद भालाधरे, तर मानखुर्द शिवाजीनगर
मतदारसंघातून गौतम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.
****
काँग्रेस पक्षानं औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघाचे उमेदवार बदलले आहेत. पक्षानं काल जाहीर केलेल्या
चौथ्या यादीत सिल्लोडमधून प्रभाकर पालोदकर यांची उमेदवारी
रद्द करुन कैसर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातही
मोहन सिंग यांची उमेदवारी रद्द करुन उदेनसिंग पडवी यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण
पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधार काँग्रेसनं
आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमधून माधव पाटील जवळगावकर
आणि नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,
काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचं सरकार आल्यावर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना
सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतला जाईल, असं आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. जालना जिल्ह्यातल्या
घनसावंगी मतदार संघात राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित जाहीर सभेत
ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी
दिल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात पक्षाकडे आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले. केंद्र
आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पाटील यांनी यावेळी टीका केली.
****
दुष्काळ, शेतकरी आत्महत्या
असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते.
राज्यातलं वातावरण पाहता परिवर्तन होईल, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं. लोक ज्यावेळी
नाराज असतात तेव्हाच कलम ३७० आणि राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उचलले जातात, अशी टीका
पवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल गुन्ह्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,
मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी होती, असं ते म्हणाले.
****
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या
विशाखापट्टणम इथ सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या २० षटकांत तीन गडी बाद ३९ धावा झाल्या आहेत. डीन
एल्गर २७ धावांवर खेळत असून भारताकडून रविचंद्रन अश्विननं दोन तर रविंद्र जडेजानं एक
गडी बाद केला. त्याआधी भारतानं आपला पहिला डाव सात गडी बाद ५०२ धावांवर घोषित केला.
सलामीवीर मयंक अग्रवालनं २१५ तर रोहित शर्मानं १७६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिका अद्याप
४६३ धावांनी पिछाडीवर आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर
इथल्या श्री तुळजाभवानी देवीची काल पाचव्या माळेनिमित्त मुरली अलंकार विशेष महापूजा
मांडली होती. यामध्ये सिंह या वाहनावर आरुढ होऊन तुळजाभवानी माता बासरी वाजवत असल्याचं
दाखवण्यात आलं होतं.
****
No comments:
Post a Comment