Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 18
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात अधिक जोर धरत
आहे. शहरातल्या तीन आणि ग्रामीण भागातल्या सहा मतदारसंघातले उमेदवार प्रचाराची मुदत
संपण्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, कोपरा बैठका घेत
आहेत. एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील तिनही मतदार संघांत
मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. ओवेसी यांच्यासह खासदार इम्तियाज जलील, हैदराबाद
इथले आमदार अहमद पाशा कादरीही त्यांच्यासह या प्रचारात सहभागी झाले. सिल्लोड मतदारसंघातले
अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी शहरातल्या महावीर चौकात जाहीर सभा घेतली. औरंगाबाद
पूर्वचे भाजप शिवेसनेचे उमेदवार अतुल सावे यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या.
****
गडचिरोली जिल्हा येत्या पाच वर्षांत नक्षलमुक्त करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यातल्या आल्लापल्ली इथं भाजप उमेदवाराच्या
प्रचारसभेत बोलत होते. नक्षलवादी विकास विरोधी असून गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नक्षलवादावार अंकूश लावला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या केज - परळी विधानसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
उमेदवारांच्या प्रचारासाठी अंबेजोगाई इथं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सभा झाली.
आपण सत्तेत असताना इथं कारखाने काढले, आज याठिकाणी नवीन कारखाने येण्याची गरज असून
बेकार तरुणांच्या हाताला काम मिळण्याची गरज असल्याचं पवार यावेळी म्हणाले. शरद पवार
यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ सभा
झाली. राज्याचं प्रेरणास्थान छंत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा चौथीच्या पुस्तकातून
काढण्याचं पाप या सरकारनं केलं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. माजी केंद्रीयमंत्री
सुशीलकुमार शिंदे सभेला उपस्थित होते.
****
राज्यातील बावीसशे उद्योग बंद पडले असून बेरोजगारी वाढत आहे तसंच शेतकरी आत्महत्या
करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. ते आज
सांगली इथं प्रचारसभेत बोलत होते. जात, धर्म, मंदिर आणि मशीद यांची चर्चा करण्याऐवजी
बेरोजगाराना रोजगार मिळवून देणं गरजेचं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर - सेलू मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार मेघना सोकोरे
बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ बोरी इथं भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची सभा झाली. भाजपनं
केलेल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर टीका केली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुनीर
पटेल यांच्या प्रचारासाठी प्रा. यशपाल भिंगे यांची सभा पार पडली. दरम्यान, वंचित बहुजन
आघाडीचे अध्यक्ष विधीज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची वाशिम इथं सभा होत आहे.
****
आयएनएक्स मिडीया गैरव्यवहार प्रकरणी नवी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्या
प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च
न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. दरम्यान, केंद्रीय अऩ्वेषण विभागानं चिदंबरम तसंच
शासकीय अधिकाऱ्यांसह इतरांविरुद्ध आयएनएक्स मिडीया गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक
कायद्याखाली नवी दिल्लीतील न्यायालयात आज दोषारोपपत्र दाखल केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी एअर इंडीयाला
डबघाईला आणलं तसंच पंजाब - महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात
यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये
पत्रकारांशी बोलत होते.
****
नाशिकमधील हिंदुस्तान ॲरोनॉटीक्स लिमिटेड - एच ए एल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात
लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज संपावरील कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर
बोलत होते.
****
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीनं नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी आज पदयात्रा
काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत
झाली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि खुलताबाद परिसरात आज मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला.
औरंगाबाद शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह जोरदार
पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसानं जिल्ह्यातल्या मंगरुळपीर कृषी
उत्पन्न बाजार समिती मैदानातील सोयाबीन भिजलं आहे.
****
जालना विशेष कृती दलाच्या पथकानं औरंगाबाद-बीड मार्गावरच्या बारसवाडा फाट्याजवळ
सापळा लावून एका ट्रकमधून ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला
आहे.
****
No comments:
Post a Comment