Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०३ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** अवकाळी
पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दहा हजार कोटी रुपये मदत जाहीर
** मदत तुटपुंजी - राष्ट्रवादी काँग्रेसची टीका; तर काँग्रेसच्या
मते जनतेच्या डोळ्यात धूळफेक
** सात नोव्हेंबरपर्यंत भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन
होणार - सुधीर मुनगंटीवार
** मराठवाड्यात कालही पाऊस; औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात
अतिवृष्टीची नोंद
आणि
** ज्येष्ठ गायक पंडित रमेश कानोले यांचं निधन
****
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदतीसाठी
शासनानं दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्यातल्या तीनशे पंचवीस
तालुक्यांत अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानीचे पंचनामे करण्याचं
काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या संदर्भात केंद्र सरकारकडून
मदत मागणार आहोत, मात्र या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना
मदतीचा निर्णय घेतला, त्याला मंत्रिमंडळ उपसमितीनं मंजूरी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. राज्यातल्या पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून, ती मदतही शेतकऱ्यांना
मिळावी, याकरता विमा कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई
म्हणून शेतकऱ्यांना पाच हजार रूपयांची तातडीची मदत करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री
दिवाकर रावते यांनी काल अमरावती इथं ही माहिती दिली. रावते यांनी काल अकोला, अमरावती
जिल्ह्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. या नुकसानीची तातडीनं भरपाई मिळावी, यासाठी
पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही मदत मिळण्यास काही कालावधी लागणार असल्यानं
शासनातर्फे तातडीची मदत म्हणून पाच हजार रूपये प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात येणार
असल्याचं ते म्हणाले.
****
राज्यसरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी असल्याची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे, तर ही मदत म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक
असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पुरामुळे झालेली नुकसान
भरपाई म्हणून जाहीर केलेल्या सहा हजार आठशे कोटी रुपयांचं काय झालं, हे आधी सरकारनं
सांगावं, असं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
पत्रकारांशी बोलत होते.
सरकारनं जाहीर केलेली तुटपूंजी मदत म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची
थट्टा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते
काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना
दिलासा देण्यासाठी भाजप शिवसेनेनं एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, असा सल्लाही अजित
पवार यांनी दिला.
दरम्यान, आपल्याकडे बहुमताचं १४५ संख्याबळ नसल्याने, आपण विरोधी
बाकांवर बसण्याची पूर्ण मानसिक तयारी केली असल्याचं, अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार यांच्या विधानाला दुजोरा देत, राज्यात शिवसेनेला
पाठिंबा देण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काहीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.
****
संसदीय कार्यपद्धतीनुसार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या
भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा करावा, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत
यांनी म्हटलं आहे. ते काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. विधानसभेत
बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या ६३ आमदारांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी
आमच्याकडे तसं पत्र मागावं, असं राऊत म्हणाले. जर भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता आलं
नाही, तर शिवसेना बहुमत सिद्ध करेल, असं राऊत यांनी नमूद केलं. शिवसेनेनं सत्ता स्थापनेसंदर्भातली
बोलणी थांबवलेली नसून, ती बोलणी अद्याप सुरुच झालेली नसल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
शिवसेना `युतीचा धर्म` पाळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात सात नोव्हेंबरपर्यंत भाजप - शिवसेना - रिपाई आणि मित्र
पक्षांच्या महायुतीचंच सरकार स्थापन होईल यात आपल्याला तीळमात्र शंका नसल्याचं भाजपचे
ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते काल चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी
बोलत होते. कोणतेही प्रश्र्न एकत्र बसून चर्चा केल्यानंच सुटू शकतात, असं पत्रकारांनी
शिवसेनेच्या नाराजीबद्दल विचारलेल्या प्रश्र्नाच्या उत्तरात मुनगंटीवार म्हणाले. भाजप
आणि शिवसेनेची तीन दशकांची मैत्री कायम राहील, असा भाजपचा ठाम निर्धार असल्याचं मुनगंटीवार
यांनी यावेळी नमूद केलं.
****
दरम्यान, भाजपच्या मित्र पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय रिपब्लीकन
पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी
भाजपसोबत यावं, या विषयावर आता ओढताण करू नये, असं आवाहन केलं. राज्यात अवकाळी पावसामुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली जावी, अशी मागणीही या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे
केल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे.
****
औरंगाबाद - सिल्लोड - जळगाव या रस्त्याचं काम आठ दिवसात पूर्ण
करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. रस्ता दुरुस्त झाला नाही,
तर कारवाईला सामोरे जाण्याचा इशाराही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना
दिला आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या या रस्त्याचं काम गेल्या दीड वर्षापासून
रखडलेलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानं कालही जोरदार हजेरी लावली,
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तसंच सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. औरंगाबाद जळगाव मार्गावरच्या अनेक छोट्या नद्या नाल्यांना पूर
आल्यामुळे काही मार्गांवरची वाहतुक ठप्प झाली होती.
नांदेड जिल्ह्यात अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. देगलूर
तालुक्यात टाकळी इथं काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.
जालना जिल्ह्यात भोकरदन जाफ्राबाद मार्गावरच्या केळणा नदीलाही
पूर आला आहे. भोकरदन तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं वृत्त आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची काल मराठवाड्यात ठिकठिकाणी
पालकमंत्र्यांनी पाहणी केली.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंगापूर,
खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानाची पाहणी केली.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे आज कन्नड तसंच वैजापूर तालुक्यात पीक नुकसान पाहणीनंतर, शेतकऱ्यांशी संवाद
साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा
तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल पाहणी
केली. दरम्यान, लातूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत,
अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. तालुक्यात नुकसान झालेल्या
पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची पालकमंत्री तानाजी सावंत यांनी काल पाहणी करून शेतकऱ्यांशी
संवाद साधला. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी, जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांच्या
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सरसकटपणे करून ते शासनाला तत्काळ सादर करावेत, असे निर्देश
दिले.
****
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री
अतुल सावे यांनी काल हिंगोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त
पिकांची पाहणी केली. परभणी
जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी नुकसान झालेल्या पिकांची
पाहणी केली.
****
शेतकऱ्यांना मदत देताना २२
मे २०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि सरसकट त्वरित मदत जाहीर करावी, अन्यथा
तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिला
आहे. काल परभणी तालुक्यात पीक पाहणीनंतर ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
रामदास कदम आज नांदेड जिल्ह्यात विविध भागात पीक नुकसानाची पाहणी करणार आहेत, पाहणीनंतर
ते प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
****
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
आणि बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टी मुळे झालेल्या बीड जिल्ह्यात
झालेल्या पीक नुकसानीची काल पाहणी केली. यावेळी त्यांनी गेवराई, माजलगाव आणि बीड तालुक्यातल्या
विविध गावातल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली.
****
मराठवाड्यातले ज्येष्ठ
गायक पंडित अण्णासाहेब गुंजकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रमेश कानोले यांचं काल नांदेड
इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. रमेश कानोले हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत
होते. अभिजात शास्त्रीय संगीत आणि नांदेडच्या सांगीतिक वाटचालीत त्यांचं मोलाचं योगदान
आहे. प्रसिद्ध तबलावादक महेश कानोले यांचे ते वडील होत.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा
घाटात काल जीप उलटून तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही गाडी बीडहून कपिलधारकडे जात असताना
काल संध्याकाळी हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव
तालुक्यातील सुकळी इथं वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सुनील कबाडे
असं त्यांचं नाव असून, त्यांच्यावर सेनगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघाला पकडण्यासाठी
पथकं तैनात केली असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
भारत आणि बांग्लादेश
क्रिकेट संघांदरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नवी दिल्लीतल्या
अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, रोहीत शर्मा संघाचं
नेतृत्व करणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा
पिकाचं अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्याचा परिणाम कांद्याच्या
भावावर झाला आहे. दिंडोरी तालुक्यातल्या वणी बाजार समितीत कांद्याला या हंगामातील उच्चांकी
सुमारे सहा हजार सोऴा रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार
समितीतही जवळपास हाच दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त
पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेनं पुणे, मिरज, लातूर
इथून पंढरपूरला काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर - पंढरपूर - लातूर
विशेष गाडी सहा आणि आठ नोव्हेंबरला सकाळी पावणे आठ वाजता लातूर स्थानकावरुन सुटेल आणि
साडे अकरा वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सहा आणि आठ नोव्हेंबरला
पंढरपूरहून सुटेल आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता लातूरला पोहोचेल. उस्मानाबाद, बार्शी,
कुर्डुवाडीमार्गे ही गाडी धावणार आहे.
****
No comments:
Post a Comment