आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ नोव्हेंबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात
नैसर्गिक आपत्ती ओढवली असून, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजुरांना
तातडीची मदत मिळाली पाहिजे, या उद्देशाने उद्धव ठाकरे, यांचा हा दौरा होत आहे. ओल्या
दुष्काळाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं शिवसेनेकडून
कळवण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रात
सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिश्चितता कायम आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजप
सर्वात मोठा पक्ष ठरला असून, सत्ता स्थापनेसाठीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना बहाल करण्यात आले आहेत. शिवसेना आपल्या समसमान सत्ता वाटपाच्या भूमिकेवर
ठाम असून, भाजपनं प्रथम राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करावा, असं म्हटलं आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधी पक्ष होण्याचा निर्णय जाहीर केला असून, आज शरद पवार
नवी दिल्ली इथं कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.
राज्यात
सता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद असून, याबाबतचा
अंतिम निर्णय सोनिया गांधी घेतील, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यातील लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये एकूण ९१ पूर्णांक ३३ टक्के पाणीसाठा
असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, दुपटीने पाऊस पडल्याने हे प्रकल्प भरल्याचं
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१४ नंतर प्रथमच
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण
पश्चिम रेल्वेच्या वतीनं बंगळूर - दिल्ली राजधानी एक्सप्रेस आणि बेळगाव-मिरज इंटरसिटी
एक्सप्रेस येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. या दोन्ही गाड्या मिरज मार्गे धावणार आहेत.
या गाड्यांना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंजुरी दिली आहे. या रेल्वे सुरू
करण्याची मागणी रेल्वे कृती समितीनं केली होती.
****
No comments:
Post a Comment