Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कन्नड तालुक्यातल्या
कानडगाव शिवारात शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची
पाहणीही केली. वैजापूर तालुक्यातल्या गारज गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर
ते दुपारी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं
कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यातल्या म्हैसरपूर
इथं पोहोचले असून, पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसंदर्भात,
पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची आढावा
बैठक शासकीय विश्रामगृहात आज सकाळी घेतली.
हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आपल्या जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त
भागाची पाहणी करून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. लातूरचे पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आज निलंग्यात जावून पीक परिस्थितीचा आढावा घेतला आणि
तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनीही आज शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून
वंचित राहणार नाही, यासाठी पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी
दिल्या.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही आज अकोला,
तर वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी दौरा केला. जळगाव जिल्ह्यात
पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही ममुराबाद आणि विदगाव इथं शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
****
बदलतं वातावरण, अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा सर्वाधिक फटका द्राक्ष
बागांना बसतो. लाखो रुपये खर्चूनही पावसाळ्यात द्राक्षाच्या बागा वाया जातात. यामुळे
सरकारनं विमा योजना लागू केली आहे. २०१९-२० च्या आंबिया बहरामध्ये पुनर्रचित हवामान
आधारित फळबाग योजनेत द्राक्ष, डाळिंब, केळी आणि आंबा या पिकांना नियमित आणि गारपिटीसाठीही
विमा संरक्षण मिळणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई यांच्यामार्फत ही विमा योजना
राबविली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेची चर्चा अद्याप
व्हायची आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी म्हणजे, जनादेशाचा
अपमान असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नोंदवली आहे. भाजपचे नेते
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात वक्तव्य केलं
होतं. त्यावर राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. युतीमध्ये सत्तास्थापनेसाठी कोणतीही
चर्चा सुरू नसून, त्या संदर्भात केवळ अफवा सुरू आहेत. ज्यांच्याकडे बहुमत असेल, ते
राज्यात सरकार बनवतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल, असंही ते यावेळी
म्हणाले.
****
एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या वतीनं होत असलेल्या
नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं राबवला जाणारा हा कार्यक्रम
येत्या ७ तारखेपर्यंत सुरू होणार आहे. ज्ञानाचा प्रसार, अनुभव तसंच तंत्रज्ञान आणि
परस्पर सहकार्य याबरोबरच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तालीम कायम रहावी, या उद्देशानं
हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. चीन, भारत, कझाकिस्तान, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया,
ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे शांघाय सहकार्य संघटनेचे सर्व सदस्य देश या कार्यक्रमात
सहभागी असतील.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या तीन,
टी-२० सामन्याच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज दिल्ली इथल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये
संध्याकाळी ७ वाजता सुरू
होणार आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाचं
नेत्तृत्व रोहित शर्मा करणार आहे.
****
No comments:
Post a Comment