Sunday, 3 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.11.2019 18.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानाची आज पाहणी केल्यानंतर ते औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यात राज्य सरकार कमी पडत असेल, तर केंद्र सरकारने कर्तव्य भावनेतून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले. आपल्या एक दिवशीय दौऱ्यात ठाकरे यांनी कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यातील गारज इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.
****

 अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी शासनानं १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या ३२५ तालुक्यांत अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
 केंद्र सरकारकडून मदत मागितली जाणार असली, तरी त्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला उपसमितीनं मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या ५० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून, त्यांचा पैसाही शेतकऱ्यांना मिळावा याकरता विमा कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****

 अवकाळी पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता नव्या जोमानं उभं रहावं, कमी मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांनी स्वतःचं आत्मपरिक्षण करावं आणि आगामी शिक्षक, पदवीधर निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावं, अशी सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.
****

 अवकाळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याची ग्वाही युवासेनेचे प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात कुवे गावातल्या भात आणि इतर पिकांच्या नुकसानाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी आज केली.
****

 नांदेड जिल्ह्यात सतत दहा बारा दिवस पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं असलं, तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज नांदेड इथं दिली. मुखेड तालुक्यातल्या सलगरा इथं मन्याड नदीच्या पुरात खरवडल्या गेलेल्या शेतजमीन आणि पीकाची पाहणी त्यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
****

 बुलढाणा जिल्हातील खडकपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या, सेनगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीला शनिवारी रात्रीपासून मोठा पूर आला आहे. या पुराचं पाणी मध्यरात्री धानोरा गावात घुसल्यामुळे परिसरात उरलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झाले आहे.
****

 भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धानाचे नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज या नुकसानाची पाहणी केली. तर, पालघर जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज माहिती घेतली.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या सुकळी खुर्द इथं वाघानं तरुणावर हल्ला केल्याची घटना काल घडली. यामुळे अमरावती येथील बचाव पथकासह वन विभागाची नऊ पथकं हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात दाखल झाली आहेत. अमरावतीच्या पथकाकडून वाघावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...