Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याला लवकरात लवकर
नवं सरकार प्राप्त होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी
आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण
काहीही बोलणार नाही, असं नमुद करताना त्यांनी या संदर्भात अधिक बोलणं टाळलं.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसंच राज्यातील पन्नास
लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या भेटी दरम्यान केली.
राज्यातील सव्वा तिनशे तालुक्यांत
अनेक ठिकाणी नव्वद ते शंभर टक्के शेतीचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत
करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं. राज्यातील
सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, या सर्व शेतकऱ्यांना
विम्याची रक्कम तात्काळ मिळावी तसंच केंद्रीय पाहणी पथक लवकरात-लवकर पाठवावं,
अशी विनंती गृहमंत्र्यांना केली आहे. गृहमंत्री हे लवकरच या संदर्भात
विमा कंपन्यांची बैठक घेणार असून शेतकऱ्यांनाही मदत लवकरात – लवकर मिळेल अशी ग्वाही
गृहमंत्र्यांनी यावेळी दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शाह यांनी सचिवांशी
चर्चा करून राज्यात पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत,
असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीसंदर्भात
आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिवसेनेचं मत मांडलं असल्याची माहिती पक्षाचे
नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यांनी पक्षाचे नेते रामदास कदम यांच्यासह राज्यपालांची
भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण राज्यपालांशी तासभर चर्चा केली,
ही सदिच्छा भेट होती, असं राऊत यासंदर्भात म्हणाले. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी
सरकार बनवावं, सरकार बनत नसल्याबद्दल जी संभ्रमावस्था
आहे, त्याला आपला पक्ष जबाबदार नसल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
****
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन तसंच पर्यटनमंत्री
जयकुमार रावल यांनी काल धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. राज्यात
सरकार स्थापन न झाल्यास पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश रावल यांनी
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळलं आहे.
****
आशियायी देशांच्या प्रस्तावित
प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करार अर्थात आरसीईपी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयासमोर निदर्शन
केली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर
दूध फेकून प्रस्तावित कराराविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी राजू शेट्टींसह आंदोलकांना
ताब्यात घेतलं. आरसीईपी कराराअंतर्गत सोळा आशियायी देशांमध्ये
खुला व्यापार सुरू होणार असून मुक्त बाजारपेठेमुळे किंमती
घसरण्याची तसंच आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याची शक्यता
असल्यानं या कराराला विरोध असल्याचं राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शेतकऱ्यांना पीक नुकसानीची तातडीने मदत मिळावी, विमा
भरलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा तातडीने मंजूर करावा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या
वतीने हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर
आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बारा वाजता सुरू झालेले आंदोलन अर्धा तास सुरू होतं.
****
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे
चार लाख तेहतीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज भोकरदन आणि अंबड तालुक्यातल्या राजूर,
तपोवन, मठपिंपळगाव, शेवगा इथल्या नुकसानग्रस्त मका, सोयाबीन, कापूस पिकांची पाहणी करून
शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसाग्रस्त पिकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पीकनिहाय भरपाई
निश्चित करून भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं
लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या
नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीपिक नुकसानीची पाहणी
करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि पिक विमा प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करायचे आहेत.
यात काही अडचण असल्यास ०२४०-२३३४५८२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९४२२५५८३७५ या `वॉटस
ॲप` क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी
केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या
येलदरी इथल्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यानं पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी नदीपात्रात
सोडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभुमीवर पुर्णा नदीकाठच्या ग्रामस्थांनी
नदीपात्रात जाऊ नये तसंच सतर्क रहावं, असं आवाहन परभणीचे निवासी
उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment