Wednesday, 20 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२० नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात पुढच्या महिन्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वर्तवला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सरकार स्थापनेबाबतचं चित्र पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असंही राऊत म्हणाले. सरकारमधल्या सहभागाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातली चर्चा जवळपास पूर्ण झाली असून, या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज होणारी बैठक शेवटची असेल, असंही राऊत यांनी नमूद केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बैठकीच्या अनुषंगानं बोलताना, संजय राऊत यांनी, राज्यात अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानाची तसंच शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची माहिती, पवार या बैठकीत हे पंतप्रधानांना देणार असल्याचं सांगितलं, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या प्रतिबंधांचे पडसाद संसदेत आजही उमटले. लोकसभेत विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी, लोकप्रतिनिधींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, लोकप्रतिनिधींविरोधात केलेली फौजदारी कारवाई हक्कभंग ठरत नसल्याचं स्पष्ट करत, हक्कभंगाचा मुद्दा फेटाळून लावला.
जम्मू काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सुविधा बंद असल्याचा मुद्दा राज्यसभेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, संदेश वहनासाठी इंटरनेट आवश्यक असल्याचं नमूद केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नाच्या उत्तरात, पुढच्या काही दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेऊनच, इंटरनेट सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
****
रेल्वे खानपान सेवेने खाद्य पदार्थांच्या दरात केलेली प्रचंड मोठी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे, ते आज लोकसभेत शून्य प्रहरात बोलत होते. रेल्वे हे सर्वसामान्य नागरिकांचं प्रवासाचं माध्यम असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान रास्त दराने खाद्यपदार्थ मिळावेत, अशी मागणी राऊत यांनी केली.
****
राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी केली. सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे, ती अनुक्रमे २५ हजार आणि ५० हजार रुपये प्रतिहेक्टर एवढी देण्यात यावी, अशी मागणी गावीत यांनी केली.
****
राज्यातले देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गांचा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. हे मार्ग लवकरात लवकर विकसित केले जावेत, अशी मागणी त्यांनी शून्यप्रहरात केली
****
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या जामीनअर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालय - ईडीची प्रतिक्रिया मागवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांचा जामीन अर्ज गेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला फेटाळून लावला होता, या निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय येत्या सोमवारी २५ तारखेपर्यंत आपली प्रतिक्रिया सादर करेल, असं ईडीच्या वतीने महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २६ तारखेला होणार आहे.
****
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक - पीएमसी बँकेचे खातेदार वैद्यकीय उपचार, विवाह समारंभ, शिक्षण, चरितार्थ आणि इतर अडचणींसाठी आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंत रोकड काढण्याची मागणी बँकेच्या प्रशासकांकडे करू शकतात, अशी माहिती रिझर्व बँकेनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. पीएमसी बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आढळल्याचं रिझर्व बँकेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याबाबत रिझर्व बँकेनं केलेली कारवाई जनहितविरोधी किंवा खातेदारांच्या हिताच्या विरोधात नसल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. या प्रकरणावर पुढील सुनावणी चार डिसेंबरला होणार आहे.  
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विना वातानुकूलित शयनव्यवस्था असलेली बस प्रवाशांच्या सेवेत काल दाखल झाली. या बसचा तिकिट दर हिरकणी बसच्या तिकिट दराइतका असेल. 30 आरामदायी आसनं, १५ प्रवाशांची शयनव्यवस्था, आग प्रतिबंधक उपकरणं यासह अनेक अत्याधुनिक सुविधा या नव्या बसमधे आहेत.
****
50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात 76 देश सहभागी होत असून, सुमारे 300 चित्रपट पहायला मिळणार आहेत. या महोत्सवासाठी सुमारे 10 हजार प्रतिनिधींनी नावं नोंदवली आहेत.
****


No comments: