Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्याला लवकरात लवकर नवं सरकार प्राप्त होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्या नंतर पत्रकारांशी बोलत होते.
सत्तेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही, असं नमूद करताना
त्यांनी या संदर्भात अधिक बोलणं टाळलं. राज्याला नव्या सरकारची आवश्यकता असून ती लवकरात
लवकर पूर्ण होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ओल्या दुष्काळाच्या
पार्श्र्वभूमीवर पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याकरता केंद्र सरकारनं मदत करावी,
अशी मागणी या भेटीदरम्यान आपण गृहमंत्र्यांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात
सांगितलं. गृहमंत्र्यांनी यावर मदतीचं आश्र्वासन दिलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
****
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ते आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांची `सदिच्छा` भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. आपण ही भेट कोणत्याही राजकीय हेतूशिवाय
घेत असून राज्यपाल हे राज्याच्या पालकांसारखे असतात त्यामुळे आपण त्यांची विविध विषयांवर
चर्चा करण्यासाठी भेट घेत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. आपण त्यांना शिवसेनेच्या
भूमिकेची माहितीही यावेळी देऊ, असंही ते म्हणाले.
भाजपशी चर्चा केवळ मुख्यमंत्रीपदासंदर्भात होईल, असं राऊत यांनी काल म्हटलं
होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष
अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
****
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच
जण ठार तर तीस जण जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
ठार झालेल्यांमध्ये एका तीन वर्ष वयाच्या मुलीचा समावेश आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यान
ही बस बोरघाटातल्या गारमाळा पॉईंटजवळ दरीत कोसळली. यातील जखमींवर खोपोली इथल्या सरकारी
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बॅकॉकमध्ये चौदाव्या पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक
आर्थिक परिषदेत सहभागी होणार आहेत. पूर्व आशिया शिखर परिषदेत भविष्यातील सहकार्याची
दिशा तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. ही भागीदारी भारताच्या
पूर्वकडील देशांना महत्त्व देण्याचं धोरण आणि प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीनं महत्त्वाची
आहे. पंतप्रधान शाश्वत विकासावरील विशेष कार्यक्रमातही सहभागी होणार असून, यावेळी केंद्र
सरकारच्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी
आज दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे यांची भेट घेऊन चर्चा
केली. पंतप्रधान मोदी यांची व्हिएतनामचे पंतप्रधान गुऐन जुऑन फुक आणि ऑस्ट्रेलियाचे
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा नियोजित आहे.
****
देशातल्या अंतर्गत जलमार्गाद्वारे मालवाहतुकीचं नवं पर्व आजपासून सुरू होत आहे.
पश्चिम बंगालमधील हल्दिया गोदी संकुलातून, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या गुवाहाटी
इथल्या पंडू टर्मिनलकडे कंटेनर वाहून नेणारं जहाज रवाना होणार आहे. अंतर्गत जलवाहतूक
करणाऱ्या एम. व्ही. महेश्वरी या जहाजाला नौवहन सचिव गोपाळ कृष्ण हिरवा झेंडा दाखवून
रवाना करतील.
****
दिल्लीतल्या वाढत्या वायु प्रदुषणावर उपाय म्हणून, दिल्लीत आजपासून पंधरा नोव्हेंबर
पर्यंत, रविवार वगळून, सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाहनांसाठीचं सम - विषम सूत्र
लागू असणार आहे. या काळात सम तारखांना सम वाहन क्रमांकाच्या गाड्या, तर विषम तारखांना
विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच वाहतुकीची परवानगी असेल. हा नियम सी.एन.जी. वर चालणाऱ्या
खाजगी वाहनांनाही लागू आहे. मात्र दुचाकी वाहनं, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी वापरली
जाणारी वाहनं महिला आणि शाळेच्या मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांना हा नियम लागू नसेल.
नियम मोडला तर ४ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधलं साधारण एक टक्का क्षेत्र वगळता इतर सर्वच ठिकाणांहून कलम १४४
अंतर्गत लावलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी खाजगी वाहनांची ये-जा सुरु
असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. संपूर्ण खोऱ्यातल्या मोबाईल आणि दूरध्वनी
सेवा पूर्ववत सुरु झाल्या आहेत. श्रीनगरचा आठवडी बाजारही सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं
कळवलं आहे.
****
`महा’ चक्रीवादळ ताशी सहा किलोमीटर वेगानं उत्तरेकडे सरकलं आहे. काल रात्री साडे
अकरा वाजता ते वेरावळ बंदरापासून सहाशे दहा किलोमीटर तर दीव आणि पोरबंदरपासून सहाशे
चाळीस किलोमीटर अंतरावर होतं. येत्या काही तासात या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. पुढल्या चोवीस तासांत ते पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, नंतर
ते ईशान्य दिशेकडे वेगानं सरकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गुजरात सरकारनं
खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या कळे इथं सराफा पेढीवर आज पहाटे
दरोडा पडला दरोडेखोरांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमही चोरली जवळपास ३५
ते ४० लाख रूपयांच्या मालाची चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी सांगितला आहे.
****
No comments:
Post a Comment