Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –
१५ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** वस्तू आणि सेवा कर सुधारणा अधिनियमात २२
सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
** पथकर नाक्यावर
आजपासून फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी बंधनकारक
** औरंगाबाद महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या २९ नगरसेवकांचे राजीनामे
आणि
** उस्मानाबाद इथल्या
नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालन उभारणीस प्रारंभ
****
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्यात
करण्यात आलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा
अधिनियमात एकूण २२ सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
करदात्यांसाठी आपसमेळ योजना, आगाऊ अधिनिर्णय अपील प्राधिकरण स्थापन करणं, करदात्यांसाठी
प्रक्रिया सुलभ करणं आणि अडचणींची सोडवणूक करून दिलासा देणं, कायद्याचं सुसूत्रीकरण करणं आणि तांत्रिक दुरुस्त्या अशा स्वरुपाचे
प्रस्ताव या सुधारणा अधिनियमामध्ये समाविष्ट आहेत.
राज्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
संख्येइतकी पाच हजार २९८ अधिसंख्य पदं निर्माण करण्याचा निर्णयही राज्य
मंत्रिमंडळानं घेतला आहे. अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर न
केल्याच्या कारणास्तव सेवा समाप्त होणाऱ्या आणि यापूर्वी सेवा समाप्त करण्यात
आलेल्या पदांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांना मानवतावादी
दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांकरीता नेमणूक देण्यात येणार आहे.
सर्व प्रशासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधिपत्याखालच्या कार्यालयात असलेल्या
अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय संख्या निश्चित करावी, त्यानंतर त्यांच्या सेवा अधिसंख्य
पदांवर वर्ग करून त्यांची पदं ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त करणाच्या सूचना यावेळी
देण्यात आल्या.
****
पथकर नाक्यावर कर भरताना गाड्यांना
फास्टॅग किंवा प्रिपेड रिचार्ज करता येऊ शकणारा टॅग आजपासून बंधनकारक होत आहे. या प्रिपेड
रिचार्ज टॅगमुळे पथकर नाक्यांवर शुल्क वाहनमालकाच्या बँक खात्यातून आपोआप वळतं होणार
आहे. ही सुविधा आज सकाळी आठ वाजेपासून कार्यान्वीत होणार आहे. पथकर नाक्यांवर गाडी
धारकांचा वेळ आणि गाड्यांचं इंधन वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणानं सर्व पथकर नाके इलेक्ट्रॉनिक पथकर वसुली प्रणालीनं सुसज्ज
केली आहेत.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन मंत्र्यांच्या खात्यांची
अदलाबदल केली आहे. छगन भुजबळ यांच्याकडचं जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खातं जयंत
पाटील यांना तर, जयंत पाटील यांच्याकडचं अन्न आणि नागरी पुरवठा तसंच अल्पसंख्याक विकास
हे खातं छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी
या बदलाला मान्यता दिली आहे.
****
राज्यातलं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं नागरिकत्व कायद्याच्या
अंमलबजावणीबाबत नकारात्मक भूमिका घेऊ नये, असं मत, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार
यांनी व्यक्त केलं. ते काल नाशिक इथं उत्तर महाराष्ट्र भागातल्या पराभूत उमेदवारांचं
मनोगत ऐकण्यासाठी आले होते. शिवसेनेनं देशहित विरोधी भूमिका घेऊ नये असं सांगून त्यांनी,
राष्ट्रीय हिताच्या भूमिकेसाठी भाजप शिवसेनेशी राजकीय तडजोड करू शकते असं नमूद केलं.
****
औरंगाबाद महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व
२३ आणि मित्रपक्षांच्या सहा नगरसेवकांनी काल भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे
राजीनामे सादर केले. पक्षाचे नेते विजय औताडे यांनी परवा उपमहापौरपदाचा राजीनामा दिला,
त्या पार्श्वभूमीवर तनवाणी यांनी काल नगरसेवकांची बैठक बोलावली होती. हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे
पाठवण्यात येतील, यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं तनवाणी यांनी सांगितलं. याबरोबरच
शिवसेनेसोबतची महापालिकेतली युती संपुष्टात आल्याचं आमदार अतुल सावे यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं दीर्घ आणि
मध्यम मुदतीचं कर्जसुद्धा पिक कर्जाच्या बरोबर सरसकट माफ करण्याची मागणी पद्मश्री डॉ.
विठ्ठलराव पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी शेती औजारं आणि इतर व्यवसायासाठी कर्ज काढलं आहे, मात्र दुष्काळ
आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन झालं नाही, त्यामुळे सगळी कर्ज माफ
करुन सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असं देवसरकर यांनी म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
उस्मानाबाद इथल्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालन उभारणीचा काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या
हस्ते शुभारंभ झाला. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनात एकाच वेळेस तीन
सभामंडपांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यात उद्घाटन, समारोप, दोन सांस्कृतिक
कार्यक्रम, तीन कविसंमेलन, पाच परिसंवाद, कथा लेखकांशी संवाद, कथाकथन आणि शाळकरी मुलांसाठी
बालकुमार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास २५० कक्षांच्या या ग्रंथ दालनात
देशभरातले ग्रंथ प्रकाशक ग्रंथ विक्रीसाठी येणार आहेत. संमेलनाचा सभा मंडप उभारणी आणि
कार्यक्रमांचे स्वरूप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे कार्यवाह रवींद्र
केसकर यांनी दिली.
****
वकील आकारत असलेली भरमसाठ फी न्यायदानात अडथळा ठरत असून,
ही न्यायव्यवस्थेतली गंभीर त्रुटी असल्याचं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त
केलं आहे. नागपूर इथं काल हायकोर्ट बार असोसिशनच्यावतीनं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा
यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मध्यस्थी प्रक्रियेचा
उपयोग करुन न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वी आपसी तडजोडीनं वाद मिटवले तर ही फी कमी
होऊ शकते, असं ते यावेळी म्हणाले.
****
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक
मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून नांदेड जिल्ह्याला काल २६९ कोटी ८ लाख रुपयांचा दुसरा
हप्ता प्राप्त झाल्याचं जिल्हाधिकारी
अरूण डोंगरे यांनी काल सांगितलं. ही मदत
लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
श्री क्षेत्र वाराणसी इथं येत्या आठ ते दहा फेब्रुवारी
दरम्यान होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथले वीरशैव संत साहित्याचे गाढे अभ्यासक शांतीतीर्थ स्वामी
यांची निवड करण्यात झाली आहे. निवृत्त मुख्याध्यापक शांतीतीर्थ स्वामी यांचे १० ग्रंथ
प्रकाशित झालेले आहेत, तसंच त्यांनी कपिलधार या मासिकाचं अनेक वर्ष संपादनही केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बारुळ इथल्या निम्न मानार प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी
पहिल्या आवर्तनाचा शुभारंभ आज पहाटे करण्यात आला. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे
भाऊराव मोरे, उपअभियंता राजीव कुरेकर, ब्रह्मानंद नांदगावकर, शाखा अभियंता गौरव सोनार, शाम शिराढोणकर, आणि अभिजित सुर्यवंशी उपस्थित होते.
एकूण ९९ गावातल्या ३१० हेक्टर जमिनिला या आवर्तनाचा लाभ मिळेल.
****
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल पाथरी रोडवर
वाहनांची तपासणी केली असता, चार लाख ९५ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी
पोलिसांनी दोघांना अटक केली असून, वाहनांसह आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
****
औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या महागामी नृत्य
संस्थेच्या वतीनं दोन दिवसीय वयंम नृत्य महोत्सवात काल संचालिका पार्वती दत्ता आणि
त्यांच्या शिष्यांनी विविध नृत्य प्रकार सादर केले. आज संध्याकाळी साडे सहा वाजता महागामीत
आयोजित या महोत्सवात कथक नृत्य सादर करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात वाळू माफियांनी
काल तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला. परंडा - भोत्रा रस्त्यावर सीना नदीपात्रातून
अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार अनिलकुमार हेळकर
कारवाई करण्यासाठी गेले असता, वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
केला. यात हेळकर जखमी झाले असून, त्यांच्यावर बार्शी इथल्या खासगी रुग्णालयात उपचार
सुरु आहेत.
दरम्यान, परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या सावळी ते घडोळी मार्गे वाळूची अवैध वाहतूक करणारे
पाच ट्रक काल पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पकडण्यात आले.
****
आजची शिक्षण व्यवस्था परिक्षार्थी निर्माण करत असून,
शिक्षण क्षेत्रात परिवर्तनासाठी समाजातल्या सगळ्याचं घटकांनी आपली भूमिका पार पाडणे
आवश्यक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी
म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाच्या वतीनं आयोजित
‘शिक्षणातील भारतीयता’ या विषयावर बोलत होते. देशात आज निर्माण झालेल्या बहुतांशी प्रश्नांसाठी
उच्च शिक्षीत वर्ग कारणीभूत असल्याचं मत जोशी यांनी व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment