Monday, 16 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 16.12.2019 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  १६ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.

****

** राज्य विधानसभेचं आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णयाची अपेक्षा

** अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची विरोधी पक्षाची मागणी

** शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक जब्बर पटेल यांची निवड

** औरंगाबाद महानगरपालिकेचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि नगरसेविकेचा पती विजय निकाळजेला एक लाख रूपयांची लाच घेतांना अटक

आणि

** भारताविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना वेस्ट इंडिजनं आठ गडी राखून जिंकला

****

राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपूर इथं प्रारंभ होत आहे. २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला. या अधिवेशनात शेतकऱ्यांना द्यावयाची संपूर्ण कर्जमाफी आणि अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे तसंच विविध प्रकल्पांना राज्य सरकारनं दिलेल्या स्थगितीसंदर्भातले मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, असं सरकारनं यापूर्वीच घोषित केलं आहे. चहापानानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं सांगितलं. अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. वीर सावरकर यांच्याविरूद्ध काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीसंदर्भात बोलतांना ठाकरे यांनी यासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे आणि ती कायम आहे. सरकार आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं ते म्हणाले. सरकारनं केवळ आरे शेडचं काम वगळता कोणत्याही विकास कामाला स्थगिती दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नागपूरमध्ये काल वार्ताहरांशी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरूद्ध जोरदार टीका केली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारमधल्या सहभागी पक्षांमध्ये विसंवाद असून शिवसेनेनं सत्तेकरता लाचारी पत्करली असल्याची टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत चहापानाला जाऊ इच्छित नसल्याचं ते म्हणाले. मंत्र्यांना झालेल्या खातेवाटपात अनिश्चितता असल्यामुळे, या अधिवेशनात लोकहिताच्या मुद्यांवर समाधान होणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले. 

****

भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटाची काल मुंबईत बैठक झाली, या बैठकीत आमदार आशिष शेलार यांची विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून तर आमदार देवयानी फरांदे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीवरही बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं.  

****

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक जब्बर पटेल यांच्या निवडीची काल अधिकृत घोषणा करण्यात आली. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

डिसेंबर महिना अखेरपर्यंत आधार आणि पॅन नंबर जोडणं अनिवार्य असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आयकर सेवांचा लाभ मिळणार असल्याचंही विभागानं काल सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं आधार आणि पॅन नंबर जोडण्याची मुदत ३१ सप्टेंबरवरुन ३१ डिसेंबर केली आहे. 

****

नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षाच्या वतीनं येत्या २० डिसेंबर पासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मोर्चे काढून निषेध करण्यात येणार आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारकडे यासंदर्भात विविध धर्मांविषयीची माहिती नसून, एका विशिष्ट धर्माला लक्ष्य केलं जात असल्याची टीका जलिल यांनी यावेळी केली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि एका नगरसेविकेचा पती विजय निकाळजे या दोघांना एक लाख रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. भिमनगर भावसिंगपुरा भागात अतिक्रमणामध्ये येणारं बांधकाम न पाडण्यासाठी कांबळे आणि निकाळजे या दोघांनी संबंधिताकडे अडीच लाख रूपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्यापोटी एक लाख रूपयांची लाच घेतांना त्याला पकडण्यात आलं. या भागाची नगरसेविका आशा निकाळजे यांचा विजय हा पती आहे. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानावर ठाम असतील तर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, राहूल गांधी यांच्या वक्तव्याप्रकरणी परभणी इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध करण्यात आला.

****

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं दिले जाणारे आयसीटी पुरस्कार राज्यातल्या तिघांना जाहीर झाले आहेत. यात बीड जिल्ह्यातल्या पारगाव जोगेश्वरी इथले शिक्षक सोमनाथ वाळके, अहमदनगर जिल्ह्यातल्या सरदवाडी इथले तंत्रस्नेही  शिक्षक रवी भापकर आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांचा समावेश आहे. येत्या २३ तारखेला दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

चेन्नईत झालेला भारताविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना काल वेस्ट इंडिजनं आठ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला पन्नास षटकात २८८ धावा करण्याचं आव्हान दिलं होतं. वेस्ट इंडिजनं शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर हे आव्हान आठ गडी  आणि तेरा चेंडू राखून पूर्ण केलं. तीन सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजनं एक- शून्यनं आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना अठरा डिसेंबरला विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे.

****

जालना पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल शहरातल्या संजयनगर भागातून ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त केला. या गांजाचा चोरटी विक्री करणाऱ्या दोन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अन्य एका कारवाईमध्ये विशेष कृती दलाच्या पथकानं अवैधरीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या अक्षय शिंगाडे या संशयितास काल दुपारी अंबड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह एक मॅगेजिन जप्त करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद इथं पाणी वाचवा - जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित उस्मानाबाद मॅरेथॉन काल पार पडली. या स्पर्धेत देशभरातले तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं गुरुत्वाकर्षणाच्या लहरी या विषयावर काल व्याख्यान झालं. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ परिसरात खगोलशास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्प अभिमानास्पद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं काल निलंग्याचं अक्का फौंडेशन आणि उदगीरच्या उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीनं मोफत मोतिबिंदू शिबिर घेण्यात आलं. या शबिरात  एकुण १६७ रुग्णाची तपासणी करण्यात आली, तसंच १४ जणांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी उदगीर इथं पाठवण्यात आलं.

****

परभणी जिल्हा परिषदेनं जिल्ह्यात शौचालय बांधकामात पुढाकार घेणाऱ्यांना प्रति शौचालय १५० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावरचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या आशाताई, अंगणवाडीताई, स्वच्छाग्रही, नागरिकांना शौचालय बांधकामासाठी  प्रोत्साहीत करतील, अशा व्यक्तींना हे मानधन देण्यात येणार आहे.

****

नांदेड इथं ज्येष्ठ नागरिक महासंघ -फेस्कॉमचं तेहतिसावं अधिवेशन पार पडलं. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. अधिवेशनात अर्थक्रांतीचे संस्थापक- अध्यक्ष अनिल बोकील यांचं व्याख्यान झालं.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...