Wednesday, 18 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १८ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत, महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं  करप्रणालीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वस्तू आणि सेवा कराच्या रकमेतली पस्तीस हजार दोनशे अट्ठ्याण्णव कोटी रुपये, इतकी रक्कम राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना परवाच वितरित केली आहे.

****

पोलिस कोठडीत होणाऱ्या मृत्यूबाबत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्न केला. नुकत्याच घडलेल्या अशा घटनेची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

यावर, या घटनेशी संबंधित पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून, विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणी चौकशी केली जाईल, तसंच मृत्यूचा अहवाल आल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेमंत टकले यांनी, पोलिस प्रशिक्षणादरम्यानच याबाबतीत पोलिसांना शिक्षित करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या पाटील यांनी, पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज व्यक्त केली.

****

पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या आठ पंचायत समितींच्या निवडणुकीचं वेळापत्रक काल जाहीर झालं.या निवडणुका येत्या सात जानेवारीला होणार असून मतमोजणी आठ जानेवारीला होणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई नं या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, इयत्ता दहावीची परीक्षा येत्या पंधरा फेब्रुवारीपासून ते वीस मार्च, तर इयत्ता बारावीची परीक्षा येत्या पंधरा फेब्रुवारी ते तीस मार्च या कालावधीत होणार आहे.

****

जम्मू इथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले सैनिक ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या उंबरवाडी इथे शहीद चौगुले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

****

राज्यभरात थंडीचा कडाका जाणवत असून, सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुकं पडत आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली, अहमदनगरसह वाशीम, हे जिल्हे आज सकाळच्या वेळी धुक्यात बुडालेले दिसल्याचं वार्ताहरांनी कळवलं आहे.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...