Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø रेल्वेच्या खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही- रेल्वेमंत्री पियुष गोयल
Ø औरंगाबाद जिल्ह्यातले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे, आणि भाजपचे दिलीप बनकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
Ø कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची शेतकऱ्यांनी मागणी
आणि
Ø तीन देशांच्या महिला टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून विजय तर पुरूष संघाचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडकडून दुसऱ्यांदा पराभव
****
रेल्वेच्या खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये व्यावसायिक आणि अन्य काही सेवा बाहेरुन घेण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे. संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेल्या माहितीत रेल्वे मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांचं परिवहन आणि सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे रेल्वे मंडळाकडे असेल, फक्त काही निवडक मार्गावरच्या रेल्वे गाड्यांमध्ये आधुनिक पद्धतीचे डबे खाजगी कंपन्यांकडून बनवून घेण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या सोबतच रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांची स्वच्छता, प्रतीक्षागृहं-फलाट तसंच वाहनतळांची देखरेख या सेवाही खासगी सेवाप्रदात्यांकडून घेणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे.
****
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी काल ६१ पूर्णांक ४६ टक्के मतदान झालं. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणवीर सिंह यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकीसाठी ६७२ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी परवा मंगळवारी ११ तारखेला होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परतले आहेत. त्यांनी काल मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन आणि भाजपचे दिलीप बनकर यांनीही जाधव यांच्यासह काल मनसेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या चौघांचा मनसे प्रवेश महत्वाचा असल्याचं मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितलं.
दरम्यान, इतर देशातून भारतात आलेल्या घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
****
कांदा निर्यातीवर असलेली बंदी शासनानं उठवावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं शेतकऱ्यांनी काल काही वेळ कांदा लिलाव बंद ठेवला होता. बाजार समिती परिसरात यावेळी निर्यात बंदीविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. बाजार समितीचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवून निर्यात बंदी हटवण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक आदेश बजावण्याचे आदेश बेळगाव न्यायालयानं दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता, या खटल्याच्या कालच्या सुनावणीस भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. सुपा इथल्या एका कंपनीत काम करणारा हा रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी चीनमधून भारतात परतला होता. त्याला खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या जालना आणि बदनापूर तालुक्यातून जाणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचं पस्तीस टक्के काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात बेचाळीस किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गावर तेराशे दहा कोटी चाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आजपर्यंत चारशे सदोतीस कोटी तीस लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता दिवाकर मोरे यांनी दिली. उड्डाणपुलांसह कालवायुक्त पुलांचं कामही प्रगतीपथावर असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
****
वाराणसी इथं काल चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झालं. वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधकानी आपल्या लेखनातला तोच-तो पणा टाळून इतिहास, दैवतशास्त्र, स्थलमहात्म्य आणि लोकसाहित्य अशा बहुआयामी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन संमेलनाध्यक्ष शांतितीर्थ स्वामी यांनी केलं.
****
लातूर विभागात महाराष्ट्र बॅंकेच्या नव्यानं सात शाखा सुरु करण्यासाठीचे प्रस्ताव दिलेले असून शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणा सारखी सुविधा ही अल्पदरात देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र बॅंकेचे लातूर क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीश भगूरकर दिली आहे. बॅंकेच्या व्यवसाय दिनाच्या निमित्तानं काल ग्राहक मेळाव्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी मुळे बॅंकेच्या एन पी ए चं प्रमाण कमी होणार असून, बॅंकेला शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देता येणार असल्याचं ते म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे यांची निवड झाली. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत ही निवड झाली. कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी यावेळी केलं. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी, केंद्र सरकारनं जाहीर केलेलं टेक्निकल टेक्स्टाईल हब उस्मानाबाद जिल्ह्यात उभारण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
****
साईबाबांचे गुरु श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलू इथल्या संस्थानापासून आज पायी महादिंडी काढण्यात येणार आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. साईबाबांचं जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचे २९ पुराव्यांचे देखावे या दिंडीत सादर करण्यात येणार आहेत. पाथरी इथं साईबाबा मंदिरात दिंडीचा समारोप होणार आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथं आज ’मराठवाड्याच्या विकासाचा असमतोल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड शाखा आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होणार असून, यात सिंचन अनुशेष, शिक्षण, कृषी आणि उद्योग क्षेत्रातील अनुशेष या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं तसंच चर्चा होणार आहेत.
****
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवनं आणि उद्यानं विभागाच्या दोन दिवसीय वार्षिक पुष्प प्रदर्शनाला काल औरंगाबाद इथं सुरूवात झाली. जुने उच्च न्यायालय परिसरात आयोजित या पुष्प प्रदर्शनाचं उदघाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांच्या हस्ते झालं. या पुष्प प्रदर्शनात इन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी सस्पेंशन विभाग वाळूजला चँलेंज चषक प्रदान करण्यात आला. निवासी खासगी बंगल्यातील उद्यानासाठी सानीका थत्ते यांना तर गच्चीवरील उद्यानासाठीचं प्रथम पारितोषिक डॉ.मकरंद दिवाण यांना प्रदान करण्यात आलं.
****
सहकार महर्षी पद्मश्री शामराव कदम यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त नांदेड इथं काल रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात खाजगी कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव कोलते - तळेगाव परिसरात लांडग्याच्या हल्ल्यात एक शेतकरी आणि शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लांडग्यानं आधी हल्ला केला आणि नंतर मनोऱ्याचं काम करणाऱ्या बिहारी मजुरांवर हल्ला केला. दोन्ही जखमींना उपाचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत काल मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं १७४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारतानं शेवटच्या शटकात तीन बाद १७७ धावा केल्या.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काल भारताचा बावीस धावांनी पराभव झाला. ऑकलंड इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं केलेल्या आठ बाद २७३ धावांच्या उत्तरात भारतीय संघ २५१ धावांवर सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
नांदेड इथं आजपासून नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत भाषा अभ्यासक, विचारवंत डॉ. गणेश देवी यांची व्याख्यानं होणार आहेत. नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचं हे ३८ वं वर्ष असल्याचं संयोजक दिपनाथ पत्की यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथल्या संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा समारोप काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. या संस्थेनं शिस्तप्रिय शाळा चालवून हजारो विध्यार्थी घडवले असून, या संस्थेचा मराठवाडा विभागात मोठा नावलौकिक आहे.
****
पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम होत असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
*****
***
No comments:
Post a Comment