Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
दिल्लीतल्या
निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चौघा दोषींना येत्या तीन मार्चला
फासावर चढवण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी या चौघांचं डेथ
वॉरंट - मृत्यूआदेश नव्यानं जारी केले. त्यात या चौघांना तिहार कारागृहात येत्या तीन
मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
इतिहासात
रममाण होण्याऐवजी इतिहास घडवण्याचं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला
आहे. ते आज रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यातल्या उमरठ इथं नरवीर तानाजी मालुसरे
यांच्या ३५० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधी वास्तूचं लोकार्पण केल्यानंतर
बोलत होते. या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असं
ठाकरे म्हणाले.
दरम्यान सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथंल्या श्री भराडी देवीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दर्शन घेतलं.
****
एल्गार परिषद
प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटी मार्फत समांतर चौकशी केली जाईल, असं अल्पसंख्यांक
विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची
आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये
बैठक झाली. या बैठकीनंतर मलिक यांनी माहिती पत्रकारांना माहिती दिली. एल्गार प्रकरणाचा
तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए कडे सोपवला आहे.
एनपीआर अर्थात
राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीच्या प्रश्नावली संदर्भात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी
काँग्रेस हे तिन्ही पक्ष बसून चर्चा करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रश्नांचा समावेश
त्यात करायचा, यावर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी
सर्व मंत्री, नेते आणि खासदारांनी तयारी करावी, असं आवाहन खासदार शरद पवार यांनी यावेळी
केलं.
****
मुंबईत माझगाव
इथल्या वस्तू आणि विक्री कर - जीएसटी भवनाला आज दुपारी भीषण आग लागली. नऊ मजली इमारतीच्या
नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन
दल घटनास्थळी दाखल झाले मात्र, पुरेशा उंच शिड्या नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण
झालं होतं. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतं. या आगीची चौकशी केली जाईल अशी माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी
बोलत होते.
****
सांगली जिल्ह्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येडे निपाणी फाटा इथं आज एक लाख ५८ हजार रूपयांच्या गुटख्यासह सहा लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
****
जालना पोलिसांनी
आज अवैधरीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या संशयित विकास जयराम शिंदे, किशोर दामोधर घुगे
या दोघांना अटक केली आहे. संशयितांकडून एक पिस्तुल, मॅग्झिन, दोन मोबाईल आणि कार, असा
एकूण १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस.
चैतन्य यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या
परीक्षेला उद्यापासून सुरूवात होत आहे. औरंगाबाद विभागात ४०६ परीक्षा केंद्रावर ही
परीक्षा घेण्यात येणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी औरंगाबाद, जालना,
बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून एक लाख ७१ हजार ९५९ परीक्षार्थी परीक्षा देणार
आहेत. यामध्ये एक लाख सहा हजार १४१ मुलं तर ६५ हजार ८१८ मुली आहेत. या परीक्षेत काही
गैरप्रकार आणि कॉपी होऊ नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आल्याची माहिती बोर्डाच्या सचिव
सुगत्ता पुन्ने यांनी दिली आहे.
दरम्यान,
१२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पार्सल न स्विकारता मंडळ कार्यालयात परत करणाऱ्या कनिष्ठ
महाविद्यालयांची मान्यता गोठविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माहिती विभागीय
सचिव यांनी सांगितलं आहे.
****
कोल्हापुरातील
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोकणातल्या देवगड इथून हापुस आंब्याची आवक झाली आहे.
आज या आंब्याचा मुहूर्तावरील सौदा काढण्यात आला, या सौद्यात हापूस आंब्याच्या 4 डझनाच्या
पेटीला पंचवीस हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाला.
****
उत्तर रेल्वेच्या
दिल्ली विभागात सुरू असलेल्या कामामुळे येत्या पंचवीस फेब्रुवारीपासूप एक मार्चपर्यंत
नांदेड- निझामुद्दीन- नांदेड, श्रीगंगानगर- नांदेड- श्रीगंगानगर, तसंच नांदेड जम्मूतावी
नांदेड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर नांदेड- अमृतसर गाडी आग्रा, मेरठ, अंबाला
मार्गे धावणार आहे. २९ फेब्रुवारी तसंच एक मार्च रोजी याच गाडीची वेळही बदलणार असल्याचं,
रेल्वेच्या नांदेड विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment