Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण
योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल
अर्थात ‘महा-टॅक’ स्थापन करण्यात येणार आहे. सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित
परिणाम साध्य होत आहेत का, याचंही या माध्यमातून मूल्यमापन
केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत महा-टॅकच्या
स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला
जाणार आहे. शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी महा-टॅकची
मदत होणार आहे. लोककल्याणकारी योजनांचं मूल्यमापन करून त्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी
करण्याला या माध्यमातून गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्रयांनी
व्यक्त केला.
****
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातल्या
न्यू साउथ वेल्स यांच्यातली भागीदारी अधिक व्यापक आणि परिणामाभिमुख करण्याचा निर्धार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत काल फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे
प्रमुख क्रिस मिन्स यांच्या उपस्थितीत वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सामंजस्य
करार करण्यात आले. महाराष्ट्राला २०४७ पर्यंत विकसित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक
राज्य बनवण्याच्या उद्दिष्टाला या भागीदारीमुळे बळ मिळणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देण्याचे
निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात
उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. एसटीच्या उत्पन्न
वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत, असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले.
****
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती
पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव
वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या
हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश
काल मुंबईत प्रदान करण्यात आला. ‘कुलपती पदक’ हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित
न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची, नेतृत्वगुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या
कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची
दखल घेणारं असावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
****
नवी दिल्लीत आयोजित जागतिक
ऊर्जा परिषद आणि ऊर्जा प्रदर्शनात महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला ‘सर्वोत्कृष्ट
नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईन’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री
श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. India Electricity, Power Gen India आणि Indian Utility Week 2026 या परिषदेत महाराष्ट्र ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाला
आहे. ऊर्जा क्षेत्रात राज्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं सादरीकरण या लक्षवेधक
दालनातून करण्यात येत आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या प्रमुख योजना, प्रकल्प आणि
यशाची माहिती डिजिटल माध्यमातून मांडण्यात आली आहे. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातले सकारात्मक
बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हरित ऊर्जेच्या भविष्याकडे
महाराष्ट्राची वाटचाल या दालनातून प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.
****
अयोध्येच्या राममंदिर न्यासाच्या
मुख्यकार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली
आहे. ऑपरेशन सिंदूरमधे पश्चिम हवाईदलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी
त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदकही मिळालं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ
इथल्या घरणी नदीकाठच्या पूरप्रवण क्षेत्रात सुरू असलेलं नमो उद्यानाचं काम तत्काळ थांबवावं, या प्रमुख मागणीसाठी शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उमाकांत देवंगरे यांनी
३१ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. प्रस्तावित उद्यानाची जागा नदीच्या पूर रेषेत
येत असून, भविष्यात मोठा पाऊस झाल्यास याठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या
सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी
दिला. या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा
दर्शवला.
****
No comments:
Post a Comment