Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह
चौहान यांनी आज मुंबईत महिला बचतगटांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईत
सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठकीचा हा एक भाग होता. सरकारच्या पाठबळातून सुरू असलेल्या
उपजीविका आणि कृषीविषयक उपक्रमांमध्ये कर्ज मंजुरी आणि वितरणाला होणारा विलंब, तसंच येणाऱ्या
अडचणी महिला लाभार्थींनी यावेळी मांडल्या. उद्योग आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी
वेळेवर वित्तपुरवठा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दीनदयाळ अंत्योदय
योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत १० कोटींहून अधिक ग्रामीण महिलांना
९३ लाखांपेक्षा जास्त बचतगट आणि त्यांच्या महासंघांमध्ये संघटित करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
वाराणसीतल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यासंदर्भात वाराणसीचे महापौर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी
दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांना पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत आणि बचावकार्याची
माहिती देण्यात आली. नागरिकांना कमीत कमी गैरसोयींचा सामना करावा लागेल, याची दक्षता
घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये
देखील मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा आणि
मंदाकिनी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, दोन्ही नद्या इशारा पातळीच्या
जवळून वाहत असल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.
****
नेपाळमधल्या दुर्घटनेत मृत्यू
झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी DNA प्रोफाइल लिंकिंगची
प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी आज संबंधित न्यायवैद्यक
विज्ञान प्रयोगशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं
केलं आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक इथं डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रियेची
व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत एक हजार २०४ जणांचा मृत्यू, तर चार हजारांहून
अधिक जण बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी
महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान नवी दैनिक एक्स्प्रेस रेल्वेगाडी आजपासून
सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनसवरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष
गोयल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी
होणार आहेत.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं
आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बीड शहरात या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा
दिल्यानं सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेतीसह शहरातली बहुतांश दुकानं बंद आहेत.
परभणी जिल्ह्यातही सकल मराठा
समाजाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्णा इथं नागनाथ
गुंडाळे या आंदोलकानं मोबाईल टॉवरवर चढून समर्थन दर्शवलं. मनोज जरांगे यांच्या मागण्या
मान्य झाल्या नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिल्याचं आमच्या वार्ताहराने
कळवलं आहे.
नांदेड जिल्ह्यात मराठा संघटनाच्या
वतीने आरक्षणाच्या मागणीसी ठीकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
****
भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र
राज्य अन्न आयोगकडून शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला
जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची
प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातल्या चार शाळांना आयोगाच्या पथकाने भेट देऊन, विद्यार्थ्यांना
दिला जाणारा पोषण आहार अधिकाऱ्यांनी स्वतः खाऊन त्याची गुणवत्ता तपासली. दोन शाळांच्या
स्वयंपाकघरात निकृष्ट दर्जाचं अन्न आढळून आलं असून, याप्रकरणी संबंधितांवर कारवाईचे
आदेश देण्यात आले आहेत.
****
चांगल्या दराच्या अपेक्षेने
शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा अद्याप पुरेशा प्रमाणात बाजारात नसल्याने नाशिक जिल्ह्यातल्या
बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला सध्या पाच हजार ३३० इतका उच्चांकी
दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत मात्र केंद्र सरकारने
खरेदी केलेल्या कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर कांदा बाजारात दर
चार हजार २५० वरून थेट तीन हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले होते, मात्र काल
जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये पुन्हा हे दर वाढले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा
तालुक्यात आज पहाटे तीन पूर्णांक़ सहा रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
जाणवले. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचं केंद्र सिरोंचा तालुक्यातल्या
राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनानं दिली आहे. भूकंपासंदर्भातल्या
अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत
पंडा यांनी केलं आहे.
****
नाशिक महापालिकेनं शहरातल्या
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी नैसर्गिक संसाधने संरक्षण परिषद-एन आर डी सी इंडियासोबत
पाच वर्षाचा सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत कुल रुफ, पांढऱ्या रंगाचे
परावर्तित पेंट, पर्जन्य जलपुनर्भरण, सावलीच्या जागा आणि कामगारांसाठी शेड अशा विविध उपाययोजना
राबवण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment