Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर
करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं आश्वासन
· यंदाचा गणेशोत्सव शंभर टक्के पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचं
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· राज्य विधीमंडळात शाश्वत विकासावर चर्चेची गरज आमदार आदित्य
ठाकरे यांच्याकडून व्यक्त
· चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी तसंच दुहेरीत
भारतीय खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल
आणि
· राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट
****
महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर
करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत
महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात ६ कोटी लखपती
दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या साडे ३ कोटी पूर्ण झाल्या आहेत.
उर्वरित लखपती दीदींचे लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू
असल्याचं ते म्हणाले.
****
गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व
उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी
बोलत होते. राज्यात सर्वत्र हा उत्सव शंभर टक्के पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे
प्रयत्न करावेत,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
गणेश मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचे
उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार
यांनी केलं आहे. अमितेशकुमार यांनी आज पुण्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद
साधला,
उत्सवात लेसर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं सांगून अनेक जण
सोशल मीडियावर मर्यादा सोडून बेताल वक्तव्य करत आहेत, अशा
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात काही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं
त्यांनी सांगितलं. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत कुमार यांनी हिंसक
मार्ग अवलंबणे अयोग्य असल्याचं ते म्हणाले.
****
कुणबी प्रमाणपत्रासह इतर मागण्यांसंदर्भात मराठा आरक्षण आंदोलन
नेते मनोज जरांगे यांची राज्य शासनाचे एक शिष्टमंडळ आज सायंकाळी भेट घेणार आहे. जरांगे
यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, जरांगे
यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद
मिळाला. बदनापूर, मंठा, जाफ्राबाद, भोकरदन,
परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक बाजार गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद
ठेवली. तर काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदनं
सादर केली.
लातूर जिल्ह्यातही जरांगे यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळण्यात
आला. लातूर शहरातील काही शाळा आणि महाविद्यालयं सकाळी सुरू होती, मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर काही वेळातच ती सोडून देण्यात आली. मराठा समाज बांधवांनी
दुचाकी फेरी काढून व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. दरम्यान, जिल्ह्यात बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत
नांदेड जिल्ह्यात नांदेड-नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी
रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बीड शहरातले व्यापारीही या
आंदोलनात सहभागी झाले.
हिंगोली जिल्ह्यात मराठा संघटनांच्यावतीने आज बाजरपेठा बंद ठेवण्यात
आल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुरुंदा इथं वसमत तहसीलवर ट्रॅक्टर
मोर्चा काढण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. सरमकुंडी फाटा इथं आंदोलनकर्त्यांनी
घोषणाबाजी करत रास्ता रोको केल्यामुळे काही काळ धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक
प्रभावित झाली होती.
****
राज्य विधीमंडळात शाश्वत विकासावर चर्चा घडवून आणण्याची गरज
आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नियोजित जन आंदोलनाबाबत आज छत्रपती
संभाजीनगर इथं झालेल्या सादरीकरणात बोलतांना ठाकरे म्हणाले –
बाईट - आमदार आदित्य ठाकरे
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी
मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्यावर सविस्तर सादरीकरण केलं.
****
EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी ही माहिती दिली. सतीश
धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती
एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो, तेवढ्याच
वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल, अशा
कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल, असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सावंतवाडीला जाणाऱ्या
विशेष रेल्वेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे
या कार्यक्रमात सहभाग घेतला.
गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा साडे-तीनशे विशेष
गाड्या चालवल्या जातील, तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची
व्यवस्था केली जाईल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
यावेळी सांगितलं.
राज्यातल्या प्रस्तावित पूर्व-पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही
त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम
महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल, जिथे पूर्वी रेल्वे जोडणी
नव्हती,
असं ते म्हणाले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम
प्रगतीपथावर असून, या सेवेचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरु करण्याचं
उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रूग्णालयात
एका रूग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये
दोन परिचारिकांचा समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयात असतांना रुग्णाला मुदत संपलेलं
सलाईन लावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत
संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या
महापौर सुजाता पाटील यांनी दिली.
****
धुळे जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेलगतच्या दुर्गम भागात पोलीस आणि
वनविभागाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत गांजाची शेती उध्वस्त केली. या भागात शेतपिकांच्या
आड गांजा लागवड करून त्यांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागासह पोलिसांनी
संयुक्त मोहीम राबवली. शेतात लागवड केलेला ७ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा प्रशासनाने
जागेवरच नष्ट केला.
****
मुंबई नगरपाल कार्यालयातील बेलिफ तसंच लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा
येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील
१४ शाळा तसंच महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर एकूण ४ हजार ७५२ उमेदवारांची बैठक
व्यवस्था करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ४ अशी
दोन सत्रात होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मिटमिटा परिसरात हॉटेलसाठी आकडा टाकून
वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रफिक खान करीम खान याने
जवळपास चार लाख रुपयांची वीज चोरी कल्याचं निदर्शनास आल्यानंतर पडेगाव शाखेचे सहायक
अभियंता प्रदीप निकम यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं महावितरणतर्फे
सांगण्यात आलं आहे.
****
चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत पुरूषांच्या एकेरी
प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतने कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा २१-१८, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सात्विक चिराग जोडीने फ्रान्सच्या जोडीवर २१-१७, २४-२२, २१-९ असा विजय मिळवला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या
खेळाडूशी तर सात्विक-चिराग जोडीचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार आहे. या स्पर्धेच्या
महिला एकेरी तसंच मिश्र दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
महिला टी-२० आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगविरुद्ध
होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं
गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर ९४ धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा
पराभव केला,
तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल.
****
हवामान
राज्यात बहुतांश भागाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यामध्ये संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराचा
समावेश आहे. मराठवाड्यातल्या उर्वरित जिल्ह्यांसह उत्तर तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या
बहुतांश जिल्ह्यांत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना
तसंच परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात उद्या जोरदार वाऱ्यासह पाऊस
पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment