Wednesday, 8 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 08.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      सैनिक पत्नींचं अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परीषदेत गदारोळ, कामकाज तहकूब

·      कांदा आणि तूर डाळीच्या हमी भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवन परिसरात आंदोलन

·      नक्षलवाद्यांना मदत करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह चार जणांना आजन्म कारावासाची शिक्षा

आणि

·      दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी विजय

****

सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी काल दुसऱ्या दिवशीही विधान परीषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली. परिचारक यांचं सदस्यत्व रद्द केलं जात नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू दिलं जाणार नाही, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं.

परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय असून, याचं समर्थन कोणीच करु शकत नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत चिंता व्यक्त करत, कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

दरम्यान, आमदार परिचारक यांनी वकिलाच्या माध्यमातून महिला आयोगासमोर बिनशर्त माफी मागितली आहे. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

****

अंमली पदार्थ तस्करांविरोधात विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेला आणखी मनुष्यबळ आणि विशेष पोलीस ठाणं देण्यात येईल असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार  झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी दिली. तर जलयुक्तचं काम उत्कृष्ट असून काही ठिकाणी कागदावरच काम झाल्याचा आरोप विरोधी पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत काल एकमतानं मंजूर झालं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या महापौरांच्या निवासस्थानी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. 

****

कांदा आणि तूर डाळीला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी शेट्टी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनी यावेळी कांदा आणि तूर डाळ रस्त्यावर फेकली.

****

नक्षलवाद्यांना मदत करत असल्याच्या संशयावरुन तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना काल गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. यातील अन्य एक आरोपी, विजय तिरकी याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतल्या युवा कार्यकर्त्यांना तयार करणं, त्यांना गडचिरोलीतल्या जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणं, माओवादी कट्टर विचारांचा प्रसार करणं या आरोपाखाली साईबाबाला  २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे, व्हिडिओ टेप, माओवादाचं प्रसार साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं होतं.

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं झालेल्या गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी काल बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर छापा टाकल्यानंतर तिथे १९ भ्रूण पुरलेले आढळल्याप्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी फरार झाला होता. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि तीन दलाल कार्यरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. खिद्रापुरे याला मिरजच्या न्यायालयानं १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

आधार क्रमांक मिळेपर्यंत इतर कोणत्याही ओळखपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असं सरकारनं काल स्पष्ट केलं. कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्याकडे आधार क्रमांक नाही म्हणून त्याला सरकारी योजंनाच्या लाभांपासून वंचित ठेवता येणार नाही, असं यासंदर्भात काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शासकीय योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तसंच यंत्रणेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारनं कल्याणकारी योजना आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून सरकारनं काल हे स्पष्टीकरण जारी केलं आहे.

****

आज जागतिक महिला दिन. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज देशातल्या ३१ महिलांना २०१६ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत. महिला सशक्तीकरणाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. मराठवाड्यातही जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत एक हजार पाचशे कोटी रूपयांपर्यंतची कामं करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. औरंगाबाद विभागात ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीत मनरेगा सप्ताह साजरा केला जात आहे. आज या सप्ताहांतर्गत महिला दिनानिमित्त मराठवाड्यातल्या सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. गुरूवारी सर्वसाधारण सभाही घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सागितलं.

****

उस्मानाबाद इथं होणारं ९७वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे संमेलन आता २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी ते सात ते नऊ एप्रिलदरम्यान होणार होतं. नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे वेळापत्रक पाहता स्थानिक नाट्यप्रेमी कलाकारांना या संमेलनात सहभागी होण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून हे संमेलन पुढे ढकललं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं काल पुण्यात एका खाजगी दवाखान्यात निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात पुद्दुचेरी इथं व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आग्रा, कानपूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. कुलगुरू म्हणून काम करत असताना त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. परदेशातल्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन उच्च शिक्षणाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी या काळात केलं.

****

बंगळुरु क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत काल एक-एक अशी बरोबरी साधली. कसोटी सामन्यात एका डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम पंचविसाव्या वेळेस करणारा रविचंद्रन अश्विन, फलंदाज के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. भारतीय संघानं पहिल्या डावात १८९ तर दुसऱ्या डावात २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात २७६ करत भारतावर ८७ धावांची आघाडी घेतली होती. मात्र आर अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे त्यांचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांमध्ये आटोपला.

****

राज्यात काल दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. भ्रमणध्वनीच्या मदतीनं प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार लक्षात घेता केंद्र संचालक आणि परिरक्षकांशिवाय अन्य व्यक्तींना भमणध्वनी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कालच्या पहिल्या दिवशी या परीक्षेत नकला करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं.

****

युपीआय हे मोबाईल बँकींगचे ॲप्लीकेशन वापरून फसवणूक करण्याचे एक हजार २१४ प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. हा प्रकार महाराष्ट्र बँकांच्या शाखांमध्ये घडला असून यामाध्यमातून ९ कोटी ४३ लाख रूपयांचा व्यवहार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या ॲप्लीकेशनमध्ये एक लाख रूपये कर्ज काढण्याची सुविधा असून तिचा वापर करून सायबर भामट्यांनी या महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि ते एचडीएफसी बँकेत भरले. बँकेच्या नोटीसा आल्यानंतर खातेदारांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

****

महाराष्ट्र विकास आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांनी युती करून लातूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल लातूर इथं या दोन पक्षांची संयुक्त जाहीर सभा झाली. यावेळी बोलतांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असद्दुदिन ओवेसी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवल्यामुळे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजप आणि इतर राजकीय पक्षावर टिका करत, आपल्याला  धर्मनिरपेक्षता शिकवू नये असं सांगितलं. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील, ताहेर सय्यद, आणि बसवंत उबाळे यांची भाषणे झाली.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...