आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०८ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून, ते आता सोमनाथ मंदिराला भेट देत आहेत.
त्याआधी मंदिर परिसरात एका सभेला पंतप्रधानांनी संबोधित केलं. योजनाबद्ध पद्धतीनं काम केलं तरच विकास घडवून आणणं शक्य असल्याचं
प्रतिपादन करत, गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विकास व्हावा, यासाठी आपलं सरकार प्रतिबद्ध
असल्याचा पुनरउच्चार त्यांनी यावेळी केला.
****
उत्तर
प्रदेशमधल्या लखनौच्या ठाकूरगंज विभागातल्या एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्याला ठार
करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. बारा तास चाललेल्या या कारवाईमध्ये ठार झालेल्या
या संशयित अतिरेक्याकडे शस्त्रं सापडल्याची, तसंच हा अतिरेकी इस्लामिक स्टेट अर्थात
आयएस या अतिरेकी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती दहशतवादी प्रतिबंधक पथकाचे महानिरीक्षक असीम अरूण यांनी दिली. याशिवाय अन्य तीन संशयित
अतिरेक्यांना कानपूर आणि इटवाह, इथून ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
****
उत्तरप्रदेश
आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. उत्तरप्रदेशच्या
पूर्व भागातल्या सात जिल्ह्यांमधील चाळीस जागांसाठी तर मणिपूरच्या दहा जिल्ह्यातल्या
बावीस जागांसाठी हे मतदान होत आहे. मतदान निर्भय वातावरणात आणि शांततेत पार पडावं,
यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
****
“आंतरराष्ट्रीय
योग महोत्सवाला” आज दिल्लीमध्ये सुरूवात होत आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वैंकय्या
नायडू यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होत असून, या महोत्सवात पंधरा ते अठरा देशांमधले
सुमारे साडेतीन हजार योगशिक्षक, योग अभ्यासक आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दोन
दिवस चालणाऱ्या या महोत्सवात योगविषयक कार्यशाळा, व्याख्यानं, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रमांसह
योग प्रात्यक्षिकं होणार आहेत.
****
सांगली
जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं उघडकीला आलेला गर्भलिंग चाचणी, गर्भपात आणि भ्रूणहत्यांचा
प्रकार निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारा असून, या प्रकरणाचा त्वरीत तपास करून
दोषी व्यक्तिंवर कडक कारवाई करण्यात येईल, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
यांनी केलं आहे. केसरकर यांनी काल म्हैसाळमधल्या या प्रकरणाच्या घटनास्थळाला भेट देऊन
पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकरणाबद्दल काही माहिती असल्यास नागरिकांनी
ती पोलिसांकडे द्यावी, असंही केसरकर यांनी यावेळी म्हटलं.
//*******//
No comments:
Post a Comment