Thursday, 16 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 16.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. यासाठी आज विधिमंडळाचं विशेष सत्र बोलवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. चाळीस सदस्यीय विधानसभेत एकूण बावीस आमदारांचं संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे तेरा आमदार आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

****

      जलजागृती सप्ताह आजपासून सुरु होत आहे. येत्या २२ मार्चला साजऱ्या होणाऱ्या जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे पाणी नियोजन आणि पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे.  या काळात राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव अशा पाच स्तरांवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त पथक तयार करणयाचे निर्देश आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी दिले. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या स्री भ्रूणहत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या पथकामार्फत राज्यातल्या सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार आहे. 

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...