Thursday, 16 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 16.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

राज्यसरकार शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नसून, यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारशी चर्चा करून मदत मागणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी सुमारे ३० हजार पाचशे कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे, राज्य सरकारनं हे कर्ज माफ केल्यास, इतर विकास कामांसाठी राज्याच्या तिजोरीत पुरेसा निधी शिल्लक राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना, विरोधक या मुद्याचं राजकारण करत असून, बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. २००९ मध्ये दिलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं नव्हतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनाच्या वेळीही काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणाबाजी सुरूच होती. कामकाज सुरु होण्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

****

गोवा विधानसभेत मनोहर पर्रिकर सरकारनं आज बहुमत सिद्ध केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बहुमत चाचणीसाठी आज विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्यात आलं. चाळीस सदस्यीय विधानसभेत २२ आमदारांनी विश्वासमत प्रस्तावाच्या बाजुने तर १६ आमदारांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. काँग्रेसचं विश्वजीत राणे मतदानावेळी अनुपस्थित राहिले. दरम्यान, राज्य सरकारचं खातेवाटप लवकरच केलं जाणार असल्याचं, पर्रिकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत नऊ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरिंदरसिंग यांचं अभिनंदन केलं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भाजप संसदीय दलाच्या बैठकीत बोलत होते. भाजपच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसप्ताह साजरा केला जाणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.

*****

राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काही भागात वाढल्याचं निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेनं घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची मोहीम राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले. गेल्या तीन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात स्वाईन फ्लूवरील गोळ्या, औषधांचा मुबलक साठा असून,  रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.

****

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातल्या दोन पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातला ऊर्ध्व कुंडलीका प्रकल्प तसंच नांदेड जिल्ह्यातल्या माहुर तालुक्यातला वझरा साठवण तलाव यांचा समावेश आहे.

****

राज्याच्या ग्रामीण भागात खाजगीकरणातून वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत दिली. दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून, तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करुन रुग्णांना त्यांच्या गावातच उपचार उपलब्ध करून देण्याचा राज्यशासनाचा प्रयोग यशस्वी होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीनं दिला जाणारा मिलिंद समता पुरस्कार पंजाबमधील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि लेखक एल. आर. बाली यांना आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली प्रधान यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातर्फे उद्या १७ आणि परवा १८ तारखेला राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत सिंथेटिक, ऑरगॅनिक, मटेरियल, कॅटॅलिसीस, केमिकल कायलेटिक्स या विषयांवर शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत.

//*****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...