Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 8 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
महिला
सरपंचांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसंच घरगुती हिंसाचाराविरोधात काम करण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं आयोजित
‘स्वच्छ शक्ती २०१७’ या कार्यक्रमात बोलत होते. स्त्री पुरुष भेदभावाचं समूळ उच्चाटन
करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. लोकसभाध्यक्ष
सुमित्रा महाजन, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह देशभरातून ६ हजार महिला
सरपंच या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रत्येक गावानं आपल्या गावाचा स्थापना दिवस
वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी
केलं.
****
स्त्री
भ्रूणहत्येच्या घटना रोखण्यासाठी राज्यशासन कडक पावलं उचलत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज जागतिक महिला दिनी, महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं
मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी
ठेवून योजना राबविण्यास प्राधान्य देत असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली, तसंच महिलांसाठी
‘रेंट अ होम’ या मोबाईल ॲपचं लोकार्पणही करण्यात आलं.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद
इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्त्री पुरूष समानता एकजूट फेरी
काढण्यात आली. ‘लिंगभाव सजगता’ या विषयावर मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांचं व्याख्यान
झालं.
****
स्त्री
भ्रुणहत्या, बेकायदा गर्भपाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळला भेट दिली. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील रुग्णालयांवर
लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संयुक्त समिती गठीत करण्यात
येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी
आज ताब्यात घेतलं.
****
शेतकरी
कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज आज तहकूब
करावं लागलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही ही मागणी
लावून धरली. सभागृहाचं काम सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी,
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसह स्थगन प्रस्ताव मांडला. यावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर,
यांनी, शेतकऱ्यांना सक्षम करून कर्जमाफी दिली जाणार असल्याचं सांगितलं. मात्र, या उत्तरानं
समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी, त्यानंतर
प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
मुंबईच्या
महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या हेमांगी
वरळीकर यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व सदस्यांनी महाडेश्वर यांना
पाठिंबा दिला. मनसेचे सात नगरसेवक या निवडणुकीत उपस्थित राहिले नाहीत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये येत्या चौदा तारखेला पंचायत समितींच्या सभापती आणि
उपसभापतीपदांसाठी निवडणुका घेण्याची सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पंचायत समिती निर्वाचक गणांमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी चौदा
तारखेला या निवडणुकीसाठी उपस्थित रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी
केलं आहे.
****
जिल्हा
परिषद आणि पंचायत समितींमध्ये कार्यरत विविध लेखा संवर्गातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी येत्या १५ तारखेपासून राज्यव्यापी ‘लेखणीबंद' आंदोलन करण्याचा इशारा
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्याआधी, येत्या १०
ते १४ मार्च या कालावधीत काळ्या फिती लावून काम करणार असल्याचं या संघटनेनं कळवलं आहे.
****
बुलढाणा
जिल्ह्यातल्या मलकापूरजवळ आज दुपारी एकच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीला झालेल्या
अपघातात तीन जण ठार तर अन्य आठ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. भुसावळकडून लोणारकडे वेगात
जाणाऱ्या या गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment