Saturday, 11 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 11.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 11 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या पाच राज्यामंध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत असून, अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. पाच पैकी दोन राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं २४८ जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीनं ४६, तर बहुजन समाज पक्षानं १५ जागा जिंकल्या.
उत्तराखंडमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. आतापर्यंत हाती आलेल्या एकूण ७० जागांपैकी भाजपनं ५० तर काँग्रेसनं ११ जागा जिंकल्या.
गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत असून, कोणत्याही पक्षाला अद्याप स्पष्ट बहुमत नाही. काँग्रेसनं १७, भाजपनं १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं तीन तर गोवा फॉरवर्ड पक्षानं तीन जागा जिंकल्या.
पंजाबमध्ये सत्तांतर झालं असून, काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला ७३, आम आदमी पक्षाला २०, शिरोमणी अकाली दल १५ आणि भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळाला.
मणिपूरमध्येही अद्याप कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसनं २३, भाजपनं १९, तर नागा पिपल्स फ्रंटनं चार जागा जिंकल्या.      

****

भाजपला मिळालेल्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश जनतेचे तसंच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही या यशाबद्दल जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचा उत्तर प्रदेशमधील विजय हा महाविजय असल्याचं म्हटलं आहे.
पंजाब आणि गोवा राज्यांमधील कामगिरीबाबत पूर्णपणे निराश झालो असल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलं आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये पराभूत झालेल्या शिरोमणी अकाली दलचे नेते आणि मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे उद्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
हा विजय म्हणजे विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेनं दिलेला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे यश म्हणजे भाजपला जनतेनं पुन्हा एकदा भरभक्कम पाठिंबा दिला असून विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.   

****

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ मतमोजणी थांबवून पुन्हा पारंपारिक पद्धतीनं म्हणजेचं बॅलट पेपर पद्धतीनं मतदान घेण्याची मागणी केली आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचं बटन दाबल्यानंतर मत हे भाजपलाचं होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

****

झारखंडमधील सुकमा मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ११ जवान शहिद झाले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर नक्षलवाद्यांचं हे कृत्य म्हणजे भ्याडपणाचे लक्षण असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथली अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्या ही घटना संतापजनक असून, या प्रकरणाचा तपास महिला आणि डॉक्टर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. म्हैसाळ इथं या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्या आज बोलत होत्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्यात येणार असून, त्याअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल आणि पोलीस यंत्रणा यांचं पथक तयार करून प्रत्येक तालुक्यात अशा घटना रोखण्यासाठी पाऊल उचलली जातील, असं मुंडे यांनी सांगितलं.

****

सामाजिक न्यायाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शासनाचं नेहमीच पाठबळ राहील, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांचं वितरण आज बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूरच्या चर्मकार सेवा संघाला संत रविदास पुरस्कार तर सोलापूरच्या चंद्रकांत गडेकर यांना पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

पाकिस्तानातून सुखरुप सुटका झालेले भारतीय जवान चंदू चव्हाण आज धुळे जिल्ह्यातल्या त्यांच्या गावी पोहोचले. यावेळी धुळ्याचे खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते. चंदू चव्हाणचं गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. २९ सप्टेंबर २०१६ रोजी चंदू चव्हाण चूकून सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांना चार महिन्यानंतर २१ जानेवारीला पाकिस्तान सरकारनं भारताच्या ताब्यात दिलं.  

****

लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन कटीबद्ध असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथं ट्रॅफीक सिग्नलचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूर महानगर पालिकेला विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...