Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
सर्वोच्च न्यायालयानं गोवा विधानसभेत
गुरुवारी १६ मार्चला बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. गोव्यात भारतीय जनता
पक्षाच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावर आक्षेप घेणारी याचिका काँग्रेस पक्षानं सर्वोच्च
न्यायालयात दाखल केली होती, या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं
काँग्रेस पक्षाच्या वकिलांना, काँग्रेसनं गोव्यात राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
का सादर केला नाही, असा सवाल केला. काँग्रेस समर्थक आमदारांचं पत्र राज्यपालांना देण्यात
आलं होतं का, मनोहर पर्रिकर यांचा २१ आमदारांच्या समर्थनाचा दावा सबळ नसल्याचे पुरावे
काँग्रेसकडे आहेत का, असे प्रश्नही न्यायालयानं काँग्रेस पक्षाच्या वकिलांना विचारले.
त्यानंतर न्यायालयानं, राज्यपालांनी नवी विधानसभा गठीत करून, गुरुवारी सकाळी ११ वाजता
बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं.
दरम्यान गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून
मनोहर पर्रिकर आज सायंकाळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शपथ घेणार आहेत.
****
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षण
मंत्रालयाचा पदभार आज स्वीकारला. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची
शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं, जेटली यांच्याकडे या मंत्रालयाचा
अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
****
लोकसभेत आज कामकाज सुरू होताच, काँग्रेस
पक्षानं गोवा आणि मणीपूर मध्ये भाजपच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावर आक्षेप घेत स्थगन
प्रस्तावाची सूचना दिली, मात्र अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यानं, काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस तसंच राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी प्रश्नकाळात सभात्याग केला. त्यानंतर
ही अध्यक्षांनी आज सर्व स्थगन प्रस्ताव नाकारल्यानं काँग्रेस खासदारांनी पुन्हा सभात्याग
केला.
****
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय
राखीव दलाच्या सराव शिबीरावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथसिंह यांनी
आज लोकसभेत निवेदन सादर केलं. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात १२ जवान हुतात्मा झाले
तर दोन जवान जखमी झाले होते. देशाचे वीरजवान नक्षलवादाचा समूळ बिमोड करण्यात पूर्ण
योगदान देतील, असं गृहमंत्री म्हणाले. हुतात्मा जवानांच्या संपूर्ण सेवाकाळाचं संपूर्ण
वेतन त्यांच्या कुटुंबीयांना सुरू ठेवलं जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
रेल्वेला मालवाहतुकीतून
होणाऱ्या मिळकतीतून प्रवासीभाड्यात सवलत देणं बंद करावं, या रेल्वे मंत्रालयाच्या शिफारशीवर संसदीय समितीनं शिक्कामोर्तब केलं आहे. अशी सवलत
देणं टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना
या समितीनं केली असल्याचं युएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे. रेल्वेला सध्या प्रवासी सेवा पुरवण्यासाठी
प्रती प्रवासी प्रती
किलोमीटर ७३ पैसे खर्च येतो पण रेल्वे त्याकरता फक्त ३६ पैसे भाडं आकारते.
****
नाशिकच्या महापौर पदी भारतीय जनता पक्षाच्या
रंजना भानसी यांची, तर उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी
बी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ही निवडणूक झाली. महापौर पदाच्या काँग्रेसच्या
उमेदवार आशा तडवी आणि उपमहापौर पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुषमा पगारे
यांनी माघार घेतल्यानं भानसी आणि गीते यांची बिनविरोध निवड झाली.
****
उस्मानाबाद इथले निवृत्त प्राचार्य
वेदकुमार वेदालंकार यांना तीन संगीत नाटकांच्या हिंदी अनुवादाबद्दल हिंदी साहित्य अकादमी
पुरस्कार जाहीर झाला आहे. वेदालंकार यांनी अनेक ग्रंथ तसंच काव्यसंग्रहांचा हिंदीत
अनुवाद केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या ५०० अभंगांची तुकाराम गाथा, तसंच महात्मा
फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचाही त्यांनी हिंदी अनुवाद केला आहे. संस्कृत
भाषेचे गाढे अभ्यासक असलेले वेदालंकार यांनी यजुर्वेद आणि सामवेदाचा मराठीत अनुवाद
केला आहे.
****
तुकाराम बीज आज साजरी होत आहे. पुणे
जिल्ह्यात देहू इथं संत तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून
मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झाले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं
येत्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या नाथषष्ठी महोत्सवात एकनाथांचा रांजण भरण्याला
आजपासून प्रारंभ झाला. नाथषष्ठीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पैठण परिसरात
दाखल होत आहेत.
****
रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर
आणि दिवेआगारच्या किनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिम राबविली गेली. त्यानुसार कासवांची
साडेतीनशे अंडी संवर्धन करून कासवांची
सुमारे दिडशे पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. कासवांचे अस्तित्व कायम राहण्यासाठी
ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
//******//
No comments:
Post a Comment