Tuesday, 14 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 14 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी नुकतीच शपथ घेतली आहे, राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना परवा गुरुवारी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.  

****

मणिपूरमध्ये भाजपचे बीरेन सिंग उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी समारंभास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह आसाम, सिक्कीम तसंच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

****

शत्रू संपत्ती विधेयकात राज्यसभेनं सुचवलेल्या सुधारणांना लोकसभेनं आज मान्यता दिली, हे विधेयक लोकसभेत यापूर्वीच संमत झालं होतं. आज राज्यसभेच्या सुधारणांसह हे विधेयक संसदेनं मंजूर केलं. भारतातून पाकिस्तान किंवा चीनमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मालमत्तांवर, मालकीहक्क सांगण्यावर प्रतिबंधाची तरतूद या विधेयकात आहे.

****

देशात दूध, अंडी आणि मांस उत्पादन वाढल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं आहे. लोकसभेत ते आज बोलत होते. दूध, अंडी आणि मांस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना पूर्ण मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

औषधं महागल्याच्या कारणावरून कोणत्याही गरीब रुग्णाचा मृत्यू होऊ देणार नसल्याचं केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी आज लोकसभेत सांगितलं. पंतप्रधानांच्या जन औषधी केंद्राच्या माध्यमातून जनेरिक ओषधं कमी किमतीत उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात आतापर्यंत २० हजार जनेरिक औषधं दुकानं सुरु करण्यात आल्याचं मांडविया यांनी सांगितलं.

****

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे नितीन काळजे, तर उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

****

विभागात पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापतींच्या निवडणुका आज पार पडल्या. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्यामुळे काँग्रेसच्या ताराबाई उकीर्डे सभापती तर शिवसेनेच्या कविता राठोड उपसभापती पदी निवडून आल्या. फुलंब्री पंचायत समितीत भाजपचे सर्जेराव मेटे, सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजपचे ज्ञानेश्वर तायडे तर पैठण पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या गंगाबाई चव्हाण निवडून आल्या.
लातूर जिल्ह्यात निलंगा पंचायत समिती सभापती पदी अजित माने, देवणी पंचायत समिती सभापती पदी सत्यवान कांबळे तर शिरूर अनंतपाळ पंचायत समिती सभापती पदी वर्षा भिक्का यांची निवड झाली.
नांदेड जिल्ह्यात नांदेड पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसचे सुखदेव बापूराव जाधव निवडून आले. उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष गोरठेकर, लोहा इथं  शिवसेनेचे सतीश पाटील उमरेकर, मुखेड इथं अशोक पाटील रावीकर, नायगाव इथं काँग्रेसच्या वंदना मनोहर पवार, मुदखेड इथं काँग्रेसच्या शिवकांता गंडरस, तर अर्धापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसच्या मंगला स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बीड जिल्ह्यात बीड पंचायत समिती सभापतीपदी शिवसंग्राम पक्षाच्या मनिषा कोकाटे निवडून आल्या, अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना शिवहार भताने, परळी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना मोहनराव सोळंके, केज इथं भाजपचे संदीप पाटील, गेवराईत शिवसेनेच्या अजस्मिता पंडित, पाटोदा इथं भाजपच्या पुष्पा सोनवणे, आष्टी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील, माजलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलका नरवडे, शिरूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी बेदरे, धारूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशालता सोळंके तर वडवणी पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमल गणेश शिंदे याची बिनविरोध निवड झाली.   
उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी गावडे यांची निवड झाली. तुळजापूर इथं काँग्रेसचे शिवाजी गायकवाड, उमरगा इथं काँग्रेसचे मदन पाटील, परंडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणिता मोरे, तर कळंब पंचायत समितीच्या सभापती पदी दत्ता साळुंके निवडून आले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...