Wednesday, 15 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 15.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांच्यासह ९ मंत्र्यांना शपथ; उद्या बहुमत सिद्ध करणार

·      शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

·      उस्मानाबादचे प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना संगीत नाटकांच्या अनुवादासाठी हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

आणि

·      मराठवाड्यात पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड जाहीर

****

गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी काल शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, यावेळी भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

चौथ्या वेळेस गोव्याचे मुख्यमंत्री झालेले पर्रिकर यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयानं काल पर्रिकर यांच्या या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी काँग्रेस पक्षाची याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर, पर्रिकर यांना उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं.

दरम्यान,  मणिपूरमध्ये भारतीय नता क्षाचे बीरेन सिंग आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बीरेन सिंह यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे ३२ आमदारांच्या पाठिंब्यासह सरकार स्थापनेचा दावा केला होता.

****

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी काल लोकसभेत मराठवाड्यातल्या रेल्वे प्रश्नांकडे लक्ष वेधलं. रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानित मागण्यांवरच्या चर्चेत ते बोलत होते. पूर्णा - खांडवा रेल्वे, किनवट - माहूर रेल्वे या रेल्वेमार्गांसह मराठवाड्यात रेल्वेच्या एकूणच विकासाकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

****

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विखेपाटील यांच्या कार्यालयाकडून काल जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला आहे.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमक होणारी शिवसेना सत्तेत मात्र भागीदार आहे, ही बाब हास्यास्पद असल्याचं, मुंडे यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद इथले निवृत्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना तीन संगीत नाटकांच्या हिंदी अनुवादाबद्दल हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. वेदालंकार यांनी अनेक ग्रंथ तसंच काव्यसंग्रहांचा हिंदीत अनुवाद केला आहेत. संत तुकाराम महाराजांच्या ५०० अभंगांची तुकाराम गाथा, तसंच महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचाही त्यांनी हिंदी अनुवाद केला आहे. संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेले वेदालंकार यांनी यजुर्वेद आणि सामवेदाचा मराठीत अनुवाद केला आहे. दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं वेदालंकार यांचा काल उस्मानाबाद इथं सत्कार करण्यात आला.

****

राज्यात स्त्री भ्रुणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजपासून महिनाभर बेकायदेशीर गर्भपात धडक तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी काल औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १५ एप्रिलपर्यंत चालणारी ही मोहिम नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर राबवली जाणार आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातही या अंतर्गत गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. काल जालना इथं या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यात पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापतींच्या निवडणुका काल पार पडल्या. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेसच्या ताराबाई उकिर्डे, फुलंब्रीमध्ये भाजपचे सर्जेराव मेटे, सिल्लोडमध्ये भाजपचे ज्ञानेश्वर तायडे पैठणमध्ये शिवसेनेच्या गभाबाई चव्हाण, गंगापूरमध्ये भाजपच्या ज्योती गायकवाड, सोयगावमध्ये काँग्रेसचे धरमसिंग चव्हाण, वैजापूरमध्ये भाजपचे इंदुबाई सोनवणे, खुलताबादमध्ये भाजपच्या अर्चना अंभोरे, कन्नडमध्ये विकास आघाडीच्या मीनाताई मोकासे यांची सभापती म्हणून निवड झाली.

जालना जिल्ह्यात जालना पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे, बदनापूरमध्ये शिवसेनेच्या अश्विनी मदन, भोकरदनमध्ये भाजपचे विलासराव आडगावकर, जाफ्राबादमध्ये भाजपचे साहेबराव कानडजे, परतूरमध्ये भाजपच्या शीतल तनपुरे, घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजुषा कोल्हे आणि अंबडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरला लहाने यांची सभापती पदी निवड झाली आहे.



लातूर जिल्ह्यात लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शीतल फुटाणे, औसा इथं संजय कदम, जळकोट इथं व्यंकट केंद्रे या काँग्रेसच्या सदस्यांची निवड झाली. निलंगा अजित माने, रेणापूरमध्ये अनिल भिसे, उदगीरमध्ये सत्यकला गंभीरे, अहमदपूरमध्ये अयोध्या केंद्रे, शिरूर अनंतपाळमध्ये वर्षा भिक्का, देवणी सत्यवान कांबळे, आणि चाकूरमध्ये  भाजपच्या सुनिता डावरे या भाजपच्या सदस्यांची निवड झाली आहे.



नांदेड जिल्ह्यात नांदेड पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसचे सुखदेव जाधव, उमरीराष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष गोरठेकर, लोहामध्ये शिवसेनेचे सतीश पाटील उमरेकर, मुखेड इथं अशोक पाटील रावीकर, नायगाव इथं काँग्रेसच्या वंदना मनोहर पवार, मुदखेड इथं काँग्रेसच्या शिवकांता गंडरस, तर अर्धापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसच्या मंगला स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कंधारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सभापती पद मिळाले तर माहूरमध्ये सभापती पदाची निवड झाली नाही, इथं उपसभापती पदाची निवड झाली.



बीड जिल्ह्यात बीड पंचायत समिती सभापतीपदी शिवसंग्राम पक्षाच्या मनिषा कोकाटे, अंबाजोगाईराष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना भताने, परळीराष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना सोळंके, केजमध्ये भाजपचे संदीप पाटील, गेवराईत शिवसेनेच्या अजस्मिता पंडित, पाटोद्यात भाजपच्या पुष्पा सोनवणे, आष्टीराष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील, माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलका नरवडे, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी बेदरे, धारूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशालता सोळंके तर वडवणी पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमल गणेश शिंदे याची बिनविरोध निवड झाली.

 

परभणी जिल्ह्यात परभणी पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या लताबाई बेले, पाथरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या ढगे, गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या उषा पोले, पूर्णा इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक बोकारे, मानवत इथं शिवसेनेचे बंडू मुळे, जिंतूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदू भवाळे, सोनपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा यादव, सेलू इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम पावडे, तर पालम पंचायत समितीच्या सभापतीपदी घनदाट मित्रमंडळाच्या सावित्रीबाई सोडणार यांची निवड झाली आहे.



हिंगोली जिल्ह्यात हिंगोली पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे विलास काठमोडे, औंढा नागनाथ इथं शिवसेनेचे भीमराव भगत, कळमनुरी इथं काँग्रेसच्या विजया जनार्दन, सेनगाव इथं क़ाँग्रेसच्या स्वाती पोहकर, तर वसमत इथं भाजपाचे चंद्रकांत दळवी यांची सभापती पदी निवड झाली.



उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी गावडे, तुळजापूर इथं काँग्रेसचे शिवाजी गायकवाड, उमरगा इथं काँग्रेसचे मदन पाटील, परंडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणिता मोरे, कळंब इथं दत्ता साळुंके, भूम इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली चोरमले, वाशी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री हाके, तर लोहारा पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या ज्योती पत्रिके यांची निवड झाली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं परवा शनिवारी साजऱ्या होत असलेल्या नाथषष्ठी महोत्सवात एकनाथांचा रांजण भरण्याला कालपासून प्रारंभ झाला. नाथषष्ठीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पैठण परिसरात दाखल होत आहेत.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...