आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
जम्मू
काश्मीरच्या नौशेरा आणि कृष्णा घाटीत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.
भारतीय सैन्यानंही चौख प्रत्यूत्तर दिलं असून, या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर गोळीबार
सुरु आहे. तर दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर इथं मध्यरात्री तीन च्या सुमारास
लष्करी जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती
मिळताच जवानांनी शोधमोहिम सुरु केली.
****
भारत
आणि स्पेन या उभय देशांसमोर सुरक्षेचं आव्हान असून, दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्यांनी
अधिकाधिक सहकार्य केलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्पेनची
राजधानी माद्रीद इथं पंतप्रधानांनी स्पेनचे अध्यक्ष मारियानो रजॉय यांची भेट घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उभय देशात सात महत्वपूर्ण करार झाले. नागरी हवाई वाहतूक,
सायबर सुरक्षा, अवयव प्रत्यारोपण, ऊर्जा नुतनीकरण आदी क्षेत्रातले हे करार आहेत. पंतप्रधानांनी
स्पेनचे राजे फिलिप सहावे यांचीही भेट घेतली.
****
पोलीस
उप-निरीक्षक पदासाठीच्या मुख्य परीक्षेकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० जूनपर्यंत
वाढवण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. राज्यातल्या सर्वच विद्यापीठांचे
पदवीचे निकाल १० जूनपर्यंत लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आयोगानं ही मुदत १० जूनपर्यंत
वाढवावी, जेणेकरून पदवीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या तसंच मुख्य परीक्षेसाठी
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
तंबाखू विरोधी दिन काल सर्वत्र पाळण्यात आला. औरंगाबाद इथं जिल्हा सामान्य
रुग्णालयाच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रबोधनपर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. यासंदर्भात आठवडाभर विविध कार्यक्रम
आयोजित करण्यात आले आहेत.
//********//
06.2017
No comments:
Post a Comment