Saturday, 20 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 20 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २०  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र वस्तू - सेवा करातून मुक्त; जीएसटी मंजुरीसाठी विधीमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन  

·       संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी -पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्वाही

·       इंधन अधिभार मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा काँग्रेस पक्षाचा इशारा

·       औरंगाबाद इथल्या अभियांत्रिकी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरूंची कारवाई

आणि

·       बनावट नोटा छापणाऱ्या एकास औरंगाबाद इथं अटक 

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमधून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र पूर्णपणे वगळण्यात आलं असून संपूर्ण सेवा क्षेत्राला मात्र हा कर लागू असेल. श्रीनगर इथं काल जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. वाहतुक सेवांवर पाच टक्के तर दूरसंचार सेवांवर १८ टक्के कर असेल. पंचतारांकित हॉटेल्सना २८ टक्के, वातानुकुलित उपाहार गृहांना १८ टक्के, तर साध्या उपाहार गृहांवर १२ टक्के सेवा कर आकारला जाईल. परिषदेची पुढची बैठक येत्या तीन जूनला दिल्ली इथं होणार आहे. 

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधीमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून मुंबई इथं सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य जीएसटी विधेयकासह, याच्याशी संबंधित दोन विधेयकांवर चर्चा होणार आहे.

****

शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्याच्या तुलनेत विविध निकषांवर ८१ टक्के गुण मिळवून आघाडीवर असल्याचं, निती आयोगानं म्हटलं आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काल मुंबईत एका व्याख्यानात ही माहिती दिली. निती आयोगानं गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या शेती सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं कांत म्हणाले.

****

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपध्दतीचं नियोजन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हलं आहे. काल पुणे जिल्ह्यात माण तालुक्यातल्या किरकसाल इथं जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या आगट इथंही मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली.

****

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नाशिक इथं शिवसेनेच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी ते काल बोलत होते. तूर आयात घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत, ठाकरे यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळेही शेतकऱ्यांचं नुकसान असल्यानं, या महामार्गाला शिवसेनेचा विरोध असल्याचं सांगितलं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यावेळी उपस्थित होते, भाजपा सरकार शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबाबत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करत नसल्यानं, कर्जमुक्तीचा मुद्दा पुढे आल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्य सरकारनं इंधनावरचा अधिभार तसंच मुद्रांक शुल्कात केलेली वाढ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राज्य सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलं असून खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत काहीही नियोजन नसल्याची टीका त्यांनी केली.

****

अचानक उद्भवलेली परिस्थिती, तसंच समजुतदारपणाचा अभाव असणाऱ्या जमावाशी कसं वागावं, हे शिकवणारा अभ्यासक्रम महाराष्ट्र पोलिस आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राबवणार आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी ही माहिती दिली. पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी हा अभ्यासक्रम राबवणार असल्याचं माथूर यांनी सांगितलं.    

****

उत्तराखंडात बद्रीनाथजवळ विष्णूप्रयाग परिसरात काल दुपारच्या सुमारास दरड कोसळून वाहतुक ठप्प झाली आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक अडकून पडले असून, यामध्ये औरंगाबाद इथून गेलेल्या भाविकांचा समावेश असल्याचं, औरंगाबाद इथले यात्रा व्यवस्थापक मंगेश कपोते यांनी सांगितलं. सर्व भाविक सुरक्षित असून,आज दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली असल्याची माहिती कपोते यांनी दिली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून डॉक्टर दिगंबर नेटके यांना हटवण्यात आलं आहे. या पदाचा कार्यभार डॉक्टर राजेश रगडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. औरंगाबाद इथल्या अभियांत्रिकी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरु डॉक्टर बी. ए. चोपडे यांनी ही कारवाई केली. यासंदर्भात विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित संस्थेचं संलग्नीकरण रद्द करण्याचे संकेतही कुलगुरुंनी दिले आहेत. औरंगाबाद इथं एका नगरसेवकाच्या घरी अभियांत्रिकीच्या उत्तर पत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनेकांना गेल्या मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती.

****

नोकरी लावून देण्यासह सरकारी कामं करून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी काल अटक केली. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा स्वीय सहायक असल्याचं सांगून या भामट्यानं जवळपास पंधरा जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. या भामट्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचं, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितलं.

****

बनावट नोटा तयार करून, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला औरंगाबाद इथं पोलिसांनी काल अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं. माजिद खान असं याचं नाव असून, त्याच्याकडून दोन हजार, पाचशे आणि शंभर रूपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टीसह आसपासच्या १६ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी, राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत १८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.

****

परभणी महानगरपालिकेच्या महापौर म्हणून मीना वरपूडकर आणि उपमहापौर म्हणून सय्यद समी सय्यद साहबखान यांनी पदभार स्वीकारला. शहरातल्या पाणी प्रश्नासह स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल असं महापौरांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या दिव्यांगांना येत्या तीन डिसेंबरपर्यंत अपंगत्व प्रमाणपत्र द्यावेत असे निर्देश लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. दिव्यांगांसाठी कॉल सेंटर सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. विविध क्रीडा संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठक घेतली. लातूरच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यात उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा इशारा  नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिला आहे. उघडयावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीच्या कुटूंबांना वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जाणार नाहीत, त्यांच्या शिधापत्रिका बंद केल्या जातील, असंही जिल्हाधिकारी म्हणाले.

****

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांना नवी दिल्ली इथल्या बाबू जगजीवनराम कला सांस्कृतिक तथा साहित्य अकादमीचा ‘महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बाबू जगजीवनराम यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्त येत्या १० जुलै रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार अंबेकर यांना प्रदान केला जाईल.

****

नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॅाक्टर जगदीश कदम यांना बृहन्महाराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कृत पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र, जांभेकर चरित्रग्रंथ, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

परभणी जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात सात लाख २५ हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट देण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी काल परभणी इथं वार्ताहर परिषदेत दिली. वृक्षारोपणानंतर ही झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...