आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
४ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र भक्तीभावानं साजरी होत आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,
संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह राज्यभरातून लहानमोठ्या शेकडो दिंड्या पंढरपुरात
काल दाखल झाल्या. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता
फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल तसंच रुख्मिणीची महापूजा करण्यात आली.
****
राज्यातल्या दुय्यम न्यायालयामधल्या कायद्याचं पदव्युत्तर
शिक्षण घेतलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना न्यायमूर्ती
शेट्टी आयोगाच्या शिफारशींनुसार तीन आगाऊ वेतनवाढी देण्यात येणार आहे. काल झालेल्या
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
कर्जमाफी प्रकरणी आणखी दुरुस्ती केली जाणार असल्याचं सांगून
शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं
आहे. ते काल सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलत होते. कर्जमाफीचा
फायदा गरजू शेतकऱ्यांना मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा पवार यांनी यावेळी
दिला.
****
मोहरमच्या काळात मुस्लिम समाजाकडून काढण्यात येणाऱ्या
मातमी मिरवणुकीत लहान मुलांच्या सहभागावर बंदी घालण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं
राज्य सरकारला केली आहे. मुंबईत अशा मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक स्वत:च्या शरीरावर
जखमा करून घेतात, या संदर्भात न्यायालयानं स्वत: याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर
काल झालेल्या सुनावणीदरम्यान, अशा मिरवणुकीत किमान लहान मुलांनी सहभागी होऊ नये, असं
मत न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या पीठानं व्यक्त केलं.
या संदर्भात मिरवणुकीच्या आयोजकांनीच सकारात्मक निर्णय घ्यावा, असंही न्यायालयानं म्हटलं
आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रपती
निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता येत्या १७ जुलै
रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत भुजबळ
मतदान करू शकणार आहेत. भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयाकडे अर्ज करून, मतदानाची
परवानगी मागितली होती.
****
No comments:
Post a Comment