आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
९ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
कोणत्याही कर अधिकाऱ्याला दुकानांना किंवा
व्यापारी संस्थांना पूर्व परवानगीशिवाय भेट देता येणार नाही, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं
स्पष्ट केलं आहे. याबाबतची तक्रार शून्य एक एक दोन तीन तीन सात शून्य एक एक पाच या
क्रमांकावर द्यावी, असं आवाहनही मंत्रालयानं करदात्यांना केलं आहे. जीएसटी अधिकारी
असल्याचं सोंग आणून दुकानदार आणि ग्राहकांना फसवल्याच्या अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर
मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं.
****
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मृद आरोग्य
पत्रिका देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. ते वाशिम इथं सबका साथ सबका विकास संमेलनाच्या उदघाट्न
प्रसंगी बोलत होते. पारदर्शक
कारभारामुळे गेल्या तीन वर्षात विकास कामांचा वेग वाढवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात महसूल
विभागानं गायरान जमीनीवर सिल केलेल्या रेती
साठ्यातली, रेती अवैधरित्या घेवून जाणारी २० वाहनं काल पोलिसांनी पकडली. या कारवाईत
एक कोटी २० हजार रूपयांची वाळू जप्त करण्यात आली.मोहीमेत महसूल विभागाचे अधिकारीही
सहभागी झाले होते.
****
गोमांस ओळखण्याचा एक संच राज्यातल्या न्याय
सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनालयानं विकसित केला आहे. या संचाद्वारे कुठल्याही
मांसाच्या नमुन्यावरुन ते गोमांस आहे की नाही हे अर्ध्या तासात समजू शकेल अशी माहिती
न्याय वैद्यकीय सहायक प्रयोगशाळेचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी दिली.
****
मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्त्वाच्या
व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला
आहे. मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला
आहे.
****
शिर्डी देवस्थान स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण
करण्यासाठी शासनाकडून सर्वोतपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिलं आहे. शिर्डी इथं केंद्र शासन पुरस्कृत अटल अमृत अभियान वाढीव शिर्डी
पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते काल बोलत होते.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल
अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. वसंतोत्सव या कार्यक्रमाचं
उद्घाटन करताना काल ते औरंगाबाद इथं बोलत होते.
****
No comments:
Post a Comment