Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ जुलै २०१७ सकाळी
६.५० मि.
****
** राज्य सरकारी अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांना एक
जानेवारी २०१६
पासून सातवा
वेतन आयोग लागू करणार
** शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जवसुली असल्याची अजित पवार
यांची टीका
** गंगाखेड साखर कारखाना घोटाळ्यासंदर्भात ईडी तसंच सीबीआय चौकशी करावी- धनंजय
मुंडे
** औरंगाबाद शहरातली धार्मिक स्थळांची अतिक्रमणं स्वतंत्र अधिकारी नेमून काढण्याचा
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा इशारा
आणि
** आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धुळे जिल्हा
परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक
****
राज्य सरकारी अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एक
जानेवारी २०१६
पासून लागू
करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. राज्य
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात काल मुंबईत विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाच दिवसांचा आठवडा करणे, सेवानिवृत्तीचं
वय ५८
वरुन ६०
करणं याबाबतचा
योग्य निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भात
शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या
नाट्यगृहांचं आधुनिकीकरण करुन सांस्कृतिक
संपदा जोपासणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अलिबाग इथं सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातल्या पहिल्या
नाट्यगृहाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित
होते, तिकीटांवरच्या कराच्या रकमेतून प्राप्त होणारा निधी, नाट्यगृहे
बांधण्यासाठीच वापरला जाणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री काल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले.
अलिबाग दौरा आटोपून मुंबईकडे परतण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच,
हेलिकॉप्टरनं हवेत झेपावण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्री तसंच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी
प्रसंगावधान दाखवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याचं, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर
यांनी सांगितलं. संपूर्ण यंत्रणा सुस्थितीत असल्याचं स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्री त्याच
हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना झाले.
****
सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जवसुली
असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली
आहे. काल अहमदनगर इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जिल्हा बँकांमध्ये पैसा पडून असतानाही, सरकारकडून शेतकरी प्रश्नांवर मार्ग काढू, असं
सांगितलं जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. कर्जमाफीसाठीचा लढा पुढे न्यावा
लागेल, असंही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा
वापर केला जाणार आहे. राज्यशासनानं काल याबाबतचा शासननिर्णय जारी केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्यातला घोटाळा
साडे सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, याची चौकशी सक्तवसूली संचालनालय - ईडी तसंच
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयकडून करावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात
आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, केंद्र सरकारनंही याची गांभीर्यानं दखल घ्यावी,
असं मुंडे म्हणाले.
****
औरंगाबाद शहरातल्या सार्वजनिक जागांवरची धार्मिक स्थळांची
अतिक्रमणं महापालिका अथवा जिल्हा प्रशासनला त्वरित काढता येत नसल्यास, उच्च न्यायालय
स्वतंत्र अधिकारी नेमून ही अतिक्रमणं काढण्याचे आदेश देईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाला दिला आहे. सार्वजनिक स्थळांच्या अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरील
सुनावणी दरम्यान विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी खंडपीठानं यापूवीर्वी दिलेल्या आदेशानंतरही
परिस्थितीत समाधानकारक बदल नसल्याचं निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठानं हा निर्वाणीचा
इशारा दिला.
****
सर्वोच्च न्यायालयानं आयआयटी जेईई २०१७ या परीक्षेत उत्तीर्ण
झालेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन तसंच प्रवेश प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत थांबवली
आहे. या परीक्षेसंबंधी कोणतीही याचिका उच्च न्यायालयांनी दाखल करुन घेऊ नये, असंही
न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी १० जुलैला होणार आहे.
****
राज्यातल्या बारा शैक्षणिक संस्था उन्नत महाराष्ट्र अभियानात
समाविष्ट करण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समन्वय
समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये औरंगाबाद इथल्या ग्रामोद्योगिक शिक्षण
मंडळाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी चा समावेश आहे.
****
राज्य शासनाच्यावतीनं राबवण्यात आलेल्या वृक्षलागवड
सप्ताहाचा काल समारोप झाला. या सप्ताहात राज्यभरात पाच
कोटी सहा लाखांहून अधिक विक्रमी वृक्ष लागवड
करण्यात आली. राज्यातल्या जनतेनं या मोहिमेत सहभागी होऊन ती
यशस्वी केल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार
मानले आहेत. वनसंरक्षण आणि संवर्धन प्रक्रियेला गती यावी यादृष्टीने वन विभागानं
सुरु केलेल्या ग्रीन आर्मी अर्थात हरित सेनेची सदस्य संख्या
एक कोटी सदस्य करण्याचा शासनाचा मानस आहे, शासनाच्या ‘ग्रीन आर्मी डॉट महा फॉरेस्ट
डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हरित सेनेचे सदस्य होता येईल असं वनमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, या अभियानात बीड जिल्ह्यात एकूण १६ लाख ५० हजार
रोपांची लागवड करण्यात आली.
****
नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न
केल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना काल
लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. धुळे तालुक्याच्या दौऱ्यावर गेलेल्या पंचायत
राज समितीला तालुक्यातल्या अनेक गावात, शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याचं
निदर्शनास आलं. अनेक ठिकाणी तांदळाच्या पन्नास किलोच्या सीलबंद गोण्यांमध्ये फक्त १३
किलो तांदुळ आढळला. या बाबतचा अहवाल विधिमंडळात मांडू नये, यासाठी जिल्हा परिषदेचे
उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी या समितीतले सदस्य आमदार हेमंत पाटील यांच्याशी
संपर्क साधून, दीड लाख रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला, मात्र पाटील यांच्या पूर्वसूचनेवरून
सापळा रचलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं माळी यांना अटक करून, त्यांच्याविरोधात
गुन्हा दाखल केला.
****
लातूर
इथून येत्या डिसेंबर अखेर पर्यंत विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुनील
गायकवाड यांनी दिली. ते काल लातूर इथं जिल्हा समन्वय समिती आणि सनियंत्रण समितीच्या
आढावा बैठकीत बोलत होते. मुंबई, हैद्राबाद आणि नांदेड या शहरांसाठी ही सेवा सुरु होणार
असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. लातूर इथं प्रशासनाकडून पाच एकर जागा प्राप्त झाल्यास
लवकरच आकाशवाणी केंद्र सुरू होईल, असं गायकवाड म्हणाले. जिल्ह्यात उघड्यावर शौचापासून
मुक्त झालेल्या गावांनाच खासदार निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. मुद्रा बँक योजनेअंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांना
तत्काळ कर्ज पुरवठा करावा असे निर्देश त्यांनी दिले.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या तुळजापूर देवस्थानच्या यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी नगर पालिकेचे अभियंता
महंमद फारुकी यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी राजीव
बुबने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी
३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २८ जण फरार घोषित करण्यात आले आहेत.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात
येणाऱ्या दहावी तसंच बारावी पुरवणी परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं कनिष्ठ महाविद्यालय तसंच
माध्यमिक शाळांनी संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घ्यायची आहेत. डाऊनलोड केलेली प्रवेशपत्रं
सही आणि शिक्यासह विद्यार्थ्यांना द्यावीत, असं मंडळाकडून जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात
आलं आहे.
****
परभणी शहरात अवैध सावकारी करणाऱ्या दोघांना धाड टाकून
अटक करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तीन विविध पथकांनी ही कारवाई केली.
यावेळी सावकारांकडे गहाण ठेवलेल्या संपत्तीची कागदपत्रे, तसंच सोन्याचांदीचा ऐवज सापडल्याचं
सांगण्यात आलं.
****
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जालना
जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात आष्टीसह परिसरातील १६ गावांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी
मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून १६ गावात करण्यात येणाऱ्या कामांचा
दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी दिले. या संदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment