Wednesday, 5 July 2017

Text - Air News Bulletin, Aurangabad


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 5 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक 5 जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दुरध्वनीवरून बोलून उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात घडलेल्या हिंसक घटनांची माहिती घेतली. गृह मंत्रालयानं राज्य सरकारकडून तसंच राज्यपालांकडूनही याबाबतचा अहवाल मागितला आहे.

पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत, राज्य सरकारचं समर्थन असलेले असामाजिक घटक त्या राज्यात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. फेसबुकवरच्या एका आक्षेपार्ह पोस्टनंतर त्या राज्यात उत्पन्न झालेल्या तणावामुळे तिथे निमलष्करी दलाचे तीनशे जवान तैनात करण्यात आले आहेत.

***

करचोरी करणाऱ्यांना कराच्या कक्षेत आणणं, हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज विजयवाडा इथे पत्रकारांशी बोलत होते. कर चोरीला आळा घातल्यानेच जलद विकास शक्य होईल आणि लोककल्याणाचे अधिक कार्यक्रम राबवता येतील, असं नायडू यांनी यावेळी नमूद केलं.

****

उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या सहज मिळाव्यात यासाठी राज्य शासन “ईझ ऑफ डुईंग” या धोरणाची अंमलबजावणी करत असून, यापुढे हे धोरण महानगरपालिका क्षेत्रासोबतच नगरपालिका क्षेत्रातही राबवलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  ते आज मुंबईत एका चर्चासत्रात बोलत होते.  यामुळे उद्योजकांना राज्यातल्या इतर ठिकाणीही उद्योग उभारणं सोयीचं होईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

****

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईचा पहिला हप्ता आज राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द केला.  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ६४७ कोटी रुपयांचा धनादेश महापालिकेला देण्यात आला. यावेळी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.

****

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात कडक व्यवस्था करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.  महिलांच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणांना विशेषतः महिला पोलिसांनी हाताळावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.  ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे निर्देश न्यायालयानं राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत.

****

मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन महत्वाचं असून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. नाशिक इथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते आज बोलत होते.

 राज्यात येत्या ७ जुलैपर्यंत ४ कोटी वृक्षांची  लागवड करण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत २ कोटी ४४ लाख रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन मंत्र्यांनी यावेळी दिली.

****

सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुधारित बीज भांडवल  आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनांसाठी, इच्छुक व्यक्तींकडून कर्जप्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या कर्जासाठीचे अर्ज येत्या दहा ते तेरा तारखेपर्यंत औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध असून, येत्या सतरा ते एकवीस तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासंबंधीची संपूर्ण माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

****

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र बावनथडे यांना आज अटक करण्यात आली. नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेनं केली होती. गडचिरोलीहून चंद्रपूरला जाणाऱ्या बसमधे घडलेल्या या घटनेची ध्वनी चित्रफीत सादर केल्यानंतर फरार बावनथडेंना आज पोलिसांनी अटक केली.

****

येत्या २४ तासात उत्तर महाराष्ट्रात, विशेषत: जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला आहे. या इशाऱ्याची योग्य ती दखल घेऊन, जिल्ह्यातल्या सगळ्या तहसीलदारांना  आणि नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी दिली आहे.

****

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या बेल्जियम सहकारी खेळाडूसह आज विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी सामन्यांमधला आपला पहिल्या फेरीचा सामना खेळणार आहे. तर पुरुष दुहेरीमध्ये भारताची पूरव राजा आणि दिविज शरण ही जोडी आपला पहिल्या फेरीचा सामना आज खेळणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...