Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
केंद्र
सरकार देशभरातल्या १०० जिल्ह्यांमध्ये गरीब नवाज कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याचं
अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं आहे. ते नवी दिल्ली इथं
मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या युवकांना कौशल्याधारित शिक्षण
देण्यासाठी तसंच रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं
ते म्हणाले. या शंभर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
****
हॉटेल
हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं आज तत्कालीन
रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा
दाखल केला आहे. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि आय आर सी टी सीच्या
तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री
असताना २००६ मध्ये रेल्वेच्या मालकीचे पूरी आणि रांची इथलं हॉटेल एका खासगी कंपनीला
देण्यात आलं होतं. या व्यवहाराच्या मोबदल्यात संबंधीत कंपनीनं पाटणा इथं दोन एकरची
जागा लालूप्रसाद यादव यांना दिल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. या संशयास्पद व्यवहाराचा
सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासात दिल्ली, पाटणा, रांची, पूरी, गुरुग्राम तसंच लालूप्रसाद
यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे निवासस्थान अशा १२ ठिकाणी
छापे टाकण्यात आले.
****
आर्थिकदृष्ट्या
सक्षम कुटुंबांनी घरगुती गॅस प्रमाणेच रेल्वे तिकिटांवर मिळणारं अनुदान स्वत:हून सोडावं
असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. आता रेल्वे तिकीटांची गिव्ह इट अप योजना सुरु केली
जाणार आहे. पुढच्या महिन्यात याची घोषणा केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली
आहे. यात पूर्ण किंवा अर्ध अनुदान सोडण्याचे पर्याय प्रवाशांना दिले जाणार आहेत. ऑनलाईन
तिकीटांसाठीची ही योजना लागू असणार आहे. रेल्वे तिकीटांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे
दरवर्षी रेल्वे प्रशासनाला तब्बल ३० हजार कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आसाममध्ये
आलेल्या पूरामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे
पूर परिस्थिती कायम असून, ब्रम्हपुत्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. १६ जिल्ह्यातल्या
चार लाख नागरिकांना या पूराचा फटका बसला आहे. राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात मदत
केंद्रं सुरु केली आहेत.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या
दहावी आणि बारावी पुरवणी परिक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं कनिष्ठ महाविद्यालय
आणि माध्यमिक शाळांनी लॉगीन करुन डाऊनलोड करुन घ्यायची आहेत. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या
पत्रकात ही माहिती दिली. या पुरवणी परिक्षांसाठी छापील प्रवेशपत्र आता मंडळाकडून मिळणार
नाहीत, त्यामुळे डाऊनलोड केलेली प्रवेशपत्रं सही आणि शिक्यासह विद्यार्थ्यांना द्यावीत,
असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शासनाच्या
महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांना प्राधान्य देऊन गावाचा विकास साधण्यासाठी अधिकारी,
कर्मचाऱ्यासह नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर यांनी केलं आहे. पैठण इथ आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. आज प्रत्येक गावात
ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी अधिकाऱ्यांनी योजनांबद्दल माहिती द्यावी
असं ते म्हणाले.
****
परभणी
शहरात अवैध सावकारी करणाऱ्या दोघांना धाड टाकून अटक करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या
तीन विविध पथकांनी ही कारवाई केली. यावेळी सावकारांकडे गहाण ठेवलेल्या संपत्तीची कागदपत्रे,
चांदी, सोनं सापडल्याचं कार्यालयीन अधिक्षक एम यु यादव यांनी सांगितलं. या दोघांना
ताब्यात घेण्यात आलं असून, पुढील तपास सुरु आहे.
****
पुणे
इथं झालेल्या ज्यूनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत २६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र संघ
अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राला १९ रौप्य आणि १२ कांस्य पदकं मिळाली. कर्नाटक संघानं
सर्वाधिक ७१ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे.
****
भुवनेश्वर
इथं सुरु असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेमबाजी प्रकारात मनप्रीत
कौरनं आणि धावण्याच्या शर्यतीत जी लक्ष्मण यानं सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच भारत एकूण
सात पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे.
****
लंडन
इथं सुरु असलेल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि
त्याचा जोडीदार एडुअर्ड रॉजर वेस्सेलिन पुरुष दुहेरीच्या दुसर्या फेरीत पोहोचले आहेत.
तर महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि तीची जोडीदार बेल्जिअमची क्रिस्टीन फ्लिपकेन्स
पण दुसर्या फेरीत पोहोचल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment