Saturday, 8 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 08072017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

दहशतवाद आणि त्याच्या आर्थिक पुरवठ्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी जलद कृती कार्यक्रम आखण्याबाबत जी ट्वेंटी देशांचं एकमत झालं आहे. जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथं सुरू असलेल्या बाराव्या जी ट्वेंटी परिषदेच्या पहिल्या दिवशी, दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी खाजगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे इंटरनेट आणि सोशल मीडियावर दहशतवादासंबंधातला मजकूर किंवा माहिती पाठवली जाणार नाही यासाठीची खबरदारी घेण्यासाठी पावलं उचलण्याबाबत परिषदेत निर्णय घेण्यात आला.   

****

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या परिषदेत १२२ देशांनी आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यासाठीचा जागतिक करार केला. मात्र, अमेरिका, ब्रिटन, फ्रांस आणि इतर आण्विक राष्ट्रांनी या ठरावावर बहिष्कार टाकला. या कराराच्या निमित्तानं अण्वस्रमुक्त जग बनवण्याचादृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं असल्याचं कोस्टा रिकाचे राजदूत आणि या परिषदेचे अध्यक्ष इलाईन व्हाईट गोम्स यांनी म्हटलं आहे.

****

ग्राहक व्यवहार मंत्रालयानं उत्पादक कंपन्यांना, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या पाकिटांवर त्या मालाचं वजन अथवा नग आणि मालाची कालबाह्य दिनांक मोठ्या अक्षरात टाकण्याची सक्ती केली आहे. ग्राहकांना मालावरील माहिती चटकन वाचता यावी यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. या नवीन बदलांमध्ये अधिकतम किरकोळ किंमत, उत्पादन तारीख, कालबाह्य तारीख, एकूण प्रमाण आणि ग्राहक सेवेचा तपशील देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

केंद्र सरकारनं शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यातल्या अनुसूचित जातींच्या मुलींसाठी निवासी शाळा उघडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या विभागीय बैठकीत ही माहिती दिली. या शांळांमध्ये सातवी किंवा आठवीपासून वर्ग सुरु करणार असून, सत्तर टक्के जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव असणार आहेत.  

****

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर - जी एस टी मधल्या वस्तू आणि सेवांवरचा योग्य दर समजण्यासाठी ‘जी एस टी रेट फाईंडर’ नावाचं ॲप सुरू केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं या ॲपचं उद्घाटन केलं. हे ॲप केवळ करदात्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील योग्य माहिती मिळण्यासाठी मदत करेल, असा विश्वास जेटली यांनी यावेळी व्यक्त केला.

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी १८ विरोधी पक्षांची बैठक येत्या ११ तारखेला होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत १७ जुलै पासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबाबतही चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गेल्या काही वर्षात भारतानं अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात आघाडी घेतली असल्यामुळे येत्या काळात भारत या क्षेत्रात अग्रेसर बनू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पुणे इथं जैव ऊर्जा उत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणं, हे आपल्या समोरचं आव्हान असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

****

राज्य सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अध्यादेशाला शेतकरी आंदोलन समितीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या अध्यादेशातल्या निकषांमुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतील त्यामुळे हा अध्यादेश फसवा असल्याचं समितीनं या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, कर्जमाफीची दीड लाख रुपयांची मर्यादा रद्द करुन सरसकट कर्ज माफी देण्याची मागणीही समितीनं केली आहे.

****

भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेच्या दुसर्या दिवशी भारतानं चार सुवर्ण पदक पटकावले. धावण्याच्या शर्यतीत महिला गटात हरीयाणाच्या निर्मला शेओरान, पी यू चित्रा, तर पुरुष गटात मोहम्मद अनस आणि अजय कुमार सरोज यांनी सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत भारत आतापर्यंत सहा सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण १५ पदकं जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे.

****

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाचव्या फेरीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. याआधीचे चारही सामने जिंकून भारत गुण तालिकेत दुसर्या स्थानावर आहे.

****

$04AFDF1A-21AC-4B56-B2D6-6B1D5F653812$

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...