Sunday, 9 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 09.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

** मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पाणी पुरवठा विषयक विविध १७१ प्रकल्पांचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

** शिर्डी देवस्थान स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून सहकार्याचं आश्वासन

आणि

** महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा ११५ धावांनी पराभव

** 

आता सविस्तर बातम्या

****

मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलिबाग दौऱ्यादरम्यान तसंच त्या आधी लातूर जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनांची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं राज्य नागरी उड्डाण विभागाचे संचालक कॅप्टन संजय कर्वे यांनी सांगितलं. या निर्णयामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना आता सरकारी विमानाचाच वापर करावा लागणार आहे. जवळच्या प्रवास अथवा दौऱ्यासाठी मोटार गाडीचा वापर केला जाईल.

****

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि  जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पाणी पुरवठा विषयक विविध १७१ प्रकल्पांचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी ई-भूमिपूजन केलं जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ते काल मुंबई इथं बोलत होते. १६ जिल्ह्यांमध्ये पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत यामध्ये मराठवाड्यातल्या हिंगोली, लातूर, जालना आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातल्या ८ जिल्ह्यांतील ८९ टंचाईग्रस्त गावांमध्ये साठवण टाक्या  उभारल्या जाणार असून  ९ जिल्ह्यांमधल्या पाणी गुणवत्ता बाधीत ४१ गावांमध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्र उभारणी प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

****

शिर्डी देवस्थान स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वोतपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. शिर्डी इथं केंद्र शासन पुरस्कृत अटल अमृत अभियान वाढीव शिर्डी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते काल बोलत होते. शहरं आणि विशेषत: तीर्थक्षेत्रं स्वच्छ आणि सुंदर असावीत यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. शिर्डी इथं शंभर देशातून भाविक येतात, त्यामुळे  या योजनेच्या माध्यमातून विकास कामांसाठी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिर्डी विमानतळावर लवकरच रात्रीच्या वेळेस विमान उतरवण्याची सुविधा पूर्ण क्षमतेनं सुरु केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी च्या दरासंदर्भात संपूर्ण माहिती मिळण्यासाठी सरकारनं कालपासून जीएसटी रेट्स फाइंडर’ या नावानं  एक मोबाईल ॲप सुरू केलं आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नवी दिल्ली इथं या ॲपचा शुभारंभ केला. या कराबद्दल योग्य ती माहिती मिळत नसल्यानं येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे ॲप सरकारनं सुरू केलं आहे. या ॲपमुळं आता कोणत्याही वस्तु आणि सेवा करावरच्या दरासंदर्भात माहिती मिळू शकेल.

****

देशात आतापर्यंत सुमारे चार कोटी चार लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. यामध्ये ८९ लाख हेक्टर क्षेत्रावर भात पीक, ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळी, ७३ लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, तर ७१ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या हल्ल्यात एक लष्करी जवान आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांच्या तीन मुली जखमी झाल्या. काल सकाळच्या सुमारास पाकिस्तानी लष्करानं उखळी तोफांचा मारा करुन लष्करी तळ आणि रहीवाशी भागांना लक्ष्य केलं.

पाकिस्ताननं गेल्या महिन्यात २३ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यात तीन जवान शहीद तर १२ जण जखमी झाले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधली कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती बघता जम्मूतल्या भगवती तळावरून सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी १८ विरोधी पक्षांची बैठक येत्या ११ तारखेला होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत १७ जुलै पासून सुरु होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबाबतही चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गोमांस ओळखण्याचा एक  संच राज्यातल्या न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनालयानं  विकसित केला आहे. या संचाद्वारे कुठल्याही मांसाच्या नमुन्यावरुन ते गोमांस आहे की नाही हे अर्ध्या तासात समजू शकेल अशी माहिती न्याय वैद्यकीय सहायक प्रयोगशाळेचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी  दिली. राज्यभरातल्या पोलिसांना लवकरच हे संच दिले जाणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी सामुहिक बलात्कार आणि हत्या खटल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सकाळ वर्तमानपत्राचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांची साक्ष नोंदवण्यासाठीचा अर्ज आरोपीच्या वकीलांनी मागे घेतला आहे. या खटल्याची सुनावणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या खटल्यातला दुसरा आरोपी संतोष भोवाळच्या वकीलांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह सहा जणांना साक्षीसाठी बोलवण्याबाबत अर्ज केला असून, त्यावर उद्या निर्णय अपेक्षित आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. वसंतोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना काल ते औरंगाबाद इथं बोलत होते. या केंद्रानं विमुक्त भटक्या जातीच्या उत्थानासाठी संशोधनावर भर दिला आहे, ही कौतुकाची बाब आहे असं सांगून  विमुक्त भटक्या जमातीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं बडोले यांनी नमूद केलं.

दरम्यान, सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा बडोले यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. या योजनांचा  पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्याचे निर्देश बडोले यांनी सामाजिक न्याय भवनात झालेल्या बैठकीत दिले.

****

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं काल भारताचा ११५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करतांना दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी २७३ धावाचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ केवळ १५८ धावाच करू शकला.

***

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी - २० क्रिकेट सामना होणार आहे. सामन्यासाठी वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलचा संघात समावेश केला आहे. पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-१ अशा फरकानं भारतानं याआधीच जिंकली आहे.  रात्री नऊ वाजेपासून सामन्याला सुरूवात होणार आहे.

***

यंदा मराठवाड्यातून हज यात्रेसाठी तीन हजार यात्रेकरु जाणार आहेत. यासंबंधीचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. येत्या १३ ऑगस्टपासून औरंगाबाद इथल्या चिकलठाणा विमानतळावरुन दररोज दोन विमानं जेहादकडे रवाना होणार आहेत. या यात्रेकरुंना पाच वेगवेगळ्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झाल्यामुळं पिकांना जिवदान मिळालं आहे. जिल्ह्यात ४ लाख ६ हजार हेक्टर खरीपाचं क्षेत्र असून  ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा जिल्ह्यात अहमदपूर, जळकोट, रेणापूर आणि उदगीर तालुक्यात कापसाचा पेरा वाढला आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे  उसाचं क्षेत्र ही वाढलं असल्याचं जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बी एस रणदिवे यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात महसूल विभागानं जप्त केलेल्या रेती साठ्यातली, रेती अवैधरित्या घेवून जाणारी २० वाहनं काल पोलिसांनी पकडली. या कारवाईत एक कोटी २० हजार रूपयांची वाळू जप्त करण्यात आली. मोहीमेत महसूल विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात नवे पर्व नवी दिशा अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानामध्ये विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. येत्या ११ ते २६ जुलै दरम्यान हे अभियान होणार असून, यात चित्रप्रदर्शनी, व्याख्यान, आरोग्य केंद्र आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माध्यमशास्त्र विभाग संकुल आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सहा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या मंदिरावर आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या तोंडी आणि लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तोंडी परीक्षेला १० जुलैपासून तर लेखी परीक्षेला १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा १० ते १७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.



शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या

** मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

**  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पाणी पुरवठा विषयक विविध १७१ प्रकल्पांचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

** शिर्डी देवस्थान स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून सहकार्याचं आश्वासन

आणि

** महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा ११५ धावांनी पराभव



****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...