Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 4 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
जीएसटीच्या
अंमलबजावणीनंतर आतापर्यंत त्यात कोणताही अडथळा आला नसल्याचं महसूल सचिव हसमुख अढिया
यांनी म्हटलं आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तुची किंमत आणि पुरवठा परिस्थितीवर लक्ष
ठेऊन असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान,
जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर होणाऱ्या परिणामांची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारनं काही
अधिकार्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात जीएसटी अंमलबजावणीनंतर
झालेल्या परिणामांचा आढावा घेणार आहे.
दरम्यान,
जीएसटीच्या नावाखाली छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक करण्याचा प्रकार होत
असल्याचं आढळून आल्यास ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असं आवाहन राज्याचे
अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.
****
विमुद्रीकरणानंतर
बाद झालेल्या नोटा काही अपरिहार्य कारणांमुळे बदलता आल्या नसल्यास त्याकरता विशेष खिडकी
सुरु करण्याच्या पर्यायाचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी आणखी अवधी मिळावा अशी मागणी करणार्या
याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह
बॅंकेने याप्रकरणी दोन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावे असा आदेश न्यायालयाकडून देण्यात
आला आहे. ज्या व्यक्तींना खरोखरच काही कारणांमुळे नोटा जमा करता आल्या नाहीत त्यांचा
विचार केला जाईल असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.
****
उपराष्ट्रपती
पदासाठीच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज निवडणूक आयोगानं जारी केली. या निवडणुकीसाठी
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. येत्या १८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज
भरता येणार आहे. येत्या पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती
पदासाठी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
उपराष्ट्रपती
मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत आहे.
****
आचल
कुमार ज्योती यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे. सहा जुलै पासून
ते कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्याचे निवडणूक आयुक्त नसीम झैदी हे सेवानिवृत्त होत
असल्यामुळे, या पदासाठी ज्योती यांची निवड करण्यात आली.
****
सरकारनं
डेंग्यू आजारापासून बचावासाठी सर्व उपाययोजना केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी
नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज झालेल्या यासंबंधीच्या बैठकीत ते बोलत होते.
आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना या आजारासंबंधी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश
याआधीच दिल्याचं ते म्हणाले. देशभरात या वर्षी आतापर्यंत १८ हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले
आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या अब्दीमंडी इथं उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या इको बटालियन टास्क
फोर्सची स्थापना आणि कोनशिला समारंभ आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
पार पडला. या टास्क फोर्सच्या माध्यमातून मराठवाड्यात वृक्षांची संख्या वाढवण्याचा
प्रयत्न करण्यात येणार आहे. चार कोटी वृक्षलागवड मोहीम ही आता लोक चळवळ बनली असून,
याद्वारे मराठवाडा हिरवागार होईल अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
याठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. पाणी आणि हवेची गरज पूर्ण करण्यासाठी
वृक्षलागवडीची गरज असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले.
****
कौशल्य
विकासातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातून स्वयं रोजगार मिळवण्यासाठी
सरकार प्रयत्न करत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. कौशल्य विकासाचा
प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात व्हावा, या उद्देशाने लेंड अ हॅण्ड
या स्वयंसेवी संस्थेनं पुणे ते लडाख अशी कौशल्य यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा आज
मुंबईत आली असता, तावडे यांनी मंत्रालयात यात्रेचं स्वागत केलं. पुणे महापालिकेच्या
दहा शाळांमध्ये कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरु केला असून, याच धर्तीवर हा उपक्रम
विविध शहरातल्या २०० शाळांमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
****
संत
साहित्यासाठी तसंच मानवतावादी कार्यासाठी राज्य सरकारकडून दिला जाणारा यंदाचा ज्ञानोबा
तुकाराम पुरस्कार निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. पाच
लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
देशातल्या
एका अग्रणी नियतकालिकानं केलेल्या सर्वेक्षणामध्ये औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय
आणि रुग्णालयानं बारावं स्थान पटकावलं आहे. पहिल्या १५ महाविद्यालयांमध्ये राज्यातल्या
केवळ तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. या नियतकालिकेतर्फे दरवर्षी देशातल्या सर्वोत्कृष्ट
महाविद्यालयांची यादी जाहीर होते.
****
No comments:
Post a Comment