Friday, 7 July 2017

Text-AIR News Bulletin,Aurangabad 07072017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

७ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता



****

जी ट्वेंटी देशांची बारावी परिषद आजपासून जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथं सुरु होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या परिषदेत दहशतवाद, स्थलांतर, आंतरराष्ट्रीय व्यापार, आरोग्य, महिला सबलीकरण, हवामान बदल अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी इस्राईल दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमुळे देशाचं उत्पन्न वाढणार असून, विकास होण्यास मदत होईल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. ते सिंधुदुर्ग इथं जीएसटीवर आधारित जागरुकता कार्यक्रमात बोलत होते. नागरिकांच्या जीएसटी विषयक शंकांचं प्रभु आणि जीएसटी उपायुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी निराकरण केलं. 

****

कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनाही आज पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असं आवाहन माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते. सरकारने अतिशय जाचक अटी टाकून कर्जमाफी दिली असल्यानं, या निकषांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज थोरात यांनी व्यक्त केली.

****

शिक्षण तसंच नोकरी मिळवण्यासाठी खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर केल्याचं निष्पन्न झाल्यास, संबंधीत व्यक्तीची सेवा आणि पदवी दोन्ही संपुष्टात येतील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, अशा व्यक्तीला शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते असं नमूद केलं.

****

शेतकरी आत्महत्या या समस्येचं निराकरण एका रात्रीत होणं शक्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काल यासंदर्भात एका याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान, पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं मागितलेल्या एका वर्षाच्या मुदतीस आपण सहमत असल्याचं सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं नमूद केलं.

****

राज्यातल्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन त्याबाबतचा प्रस्ताव महानिर्मिती कंपनीकडे पाठवण्याची सुचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सिंचन समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...