Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ जुलै २०१७ सकाळी
६.५० मि.
****
****
विमुद्रीकरणानंतर बाद झालेल्या नोटा काही यथार्थ कारणांमुळे बदलता आल्या नसल्यास
त्याकरता विशेष व्यवस्था सुरु करण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
केंद्र सरकारला दिले आहेत. बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी आणखी अवधी मिळावा अशी
मागणी करणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं काल हे निर्देश दिले. केंद्र
सरकार तसंच भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं याप्रकरणी दोन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं, असंही
न्यायालयानं म्हटलं आहे. ज्या व्यक्तींना खरोखरच काही कारणांमुळे नोटा जमा करता आलेल्या
नाहीत, अशा व्यक्तींचा विचार केला जाईल असं केंद्र सरकारचे महाअभिकर्ता रणजित कुमार
यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.
****
उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी
केली. या निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. येत्या १८ तारखेपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज भरता येणार असून, येत्या पाच ऑगस्टला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल. विद्यमान
उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्टला संपत आहे.
दरम्यान, अचल कुमार ज्योती यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली
आहे. सहा जुलै पासून ते कार्यभार स्वीकारतील. विद्यमान निवडणूक आयुक्त नसीम झैदी हे
सेवानिवृत्त होत असल्यामुळे, या पदासाठी ज्योती यांची निवड करण्यात आली.
****
विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास विवाहांमधली लबाडी बंद होण्यास मदत होईल तसंच
केवळ नोंद नसल्यामुळे विवाह नाकारल्या जाण्याच्या प्रकरणांपासून महिलांचं रक्षण होईल,
असं विधी आयोगानं म्हटलं आहे. विधी आयोगानं काल यासंदर्भात न्याय मंत्रालयाला अहवाल
दिला असून त्यात विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची शिफारस केली आहे. विवाह नोंदणी बंधनकारक
नसल्यामुळे महिलांची सहजपणे फसवणूक केली जात असून, अनिवासी भारतीयांमध्ये
मोठ्या प्रमाणावर असे
प्रकार होत असल्याचं आयोगानं
म्हटलं आहे.
विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास, विवाहासाठीच्या
नियमाचं पालन होईल, असं या अहवालात म्हटलं आहे.
****
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्यातल्या दोन मतदान
केंद्रांवर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात
आली नव्हती, असा अहवाल हैदराबाद इथल्या न्याय सहायक प्रयोग शाळेनं काल मुंबई उच्च न्यायालयाला
दिला. पर्वती मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी याप्रकरणी न्यायालयात
याचिका दाखल करून मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. या याचिकेच्या
सुनावणी
दरम्यान
न्यायालयानं या मतदान यंत्रांची न्याय सहायक प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे
आदेश दिले होते.
****
कौशल्य विकासातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना
विविध क्षेत्रातून स्वयं रोजगार मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं शिक्षण
मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
पुणे महापालिकेच्या दहा शाळांमध्ये कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरु केला असून,
याच धर्तीवर हा उपक्रम राज्यभरात विविध शहरातल्या २०० शाळांमध्ये सुरु करण्याचा
प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
****
राज्य
सरकारतर्फे जाहीर झालेल्या कर्जमाफीबाबतची तपशीलवार माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं
ट्विटरवरुन जाहीर केली आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या छत्तीस लाख दहा हजार
दोनशे सोळा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. या यादीत मुंबई तसंच मुंबई उपनगर
या दोन जिल्ह्यांतल्या ८१३ शेतकऱ्यांचा समावेश असल्यानं, आपण चकीत झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यापूर्वी सखोल चौकशी करण्याचे निर्देश
त्यांनी दिले.
दरम्यान,
शेतकरी कर्जमाफी संदर्भात सातत्याने
अतिरंजित खोटी आकडेवारी देऊन सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप, प्रदेश काँग्रेस
कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलताना, सावंत यांनी, सरकारने या असत्य कथनासाठी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.
संपूर्ण कर्जमाफी ३४ हजार कोटीं रुपयांची
नव्हे तर फक्त पाच हजार कोटीं रुपयांची असून, या योजनेचा लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना नव्हे, तर
फक्त १५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना
तत्काळ दहा हजार रुपयांची
उचल देण्याच्या घोषणेनंतर गेल्या तीन आठवड्यात राज्यभरात फक्त एक हजार ८२ शेतकऱ्यांनाच
दहा हजार रुपये उचल मिळाल्याचं सांगत, सावंत यांनी राज्य सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये
फरक असल्याची टीका केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या अब्दीमंडी इथं उभारण्यात आलेल्या
राज्यातल्या पहिल्या इको बटालियन टास्क फोर्सची स्थापना आणि पायाभरणी राज्याचे अर्थ
तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आली. भारतीय लष्कर आणि वनविभागान
संयुक्तपणे ही बटालीयन स्थापन केली असून या टास्क फोर्सच्या माध्यमातून मराठवाड्यात
वृक्षांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चार कोटी वृक्षलागवड मोहीम
ही आता लोक चळवळ बनली असून, याद्वारे मराठवाडा हिरवागार होईल अशी अपेक्षा मुनगंटीवार
यांनी यावेळी व्यक्त केली. काल सकाळपर्यंत राज्यभरात दोन कोटी १९ लाखावर झाडं लावल्याचं
वनमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले …
आणि मला सांगायला आनंद होतो आहे
की आज सकाळी दहा वाजेपर्यत चार कोटीच्या मिशन
पैकी दोन कोटी एकोणीस लक्ष पंधरा हजार २९६ व़ृक्ष हे चांद्या पासून बांद्या पर्यत असणाऱ्या
महाराष्ट्राच्या वृक्षप्रेमी पर्यावरणाच्या सेनापतींनी लावले आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते,
पाणी आणि हवेची गरज पूर्ण करण्यासाठी वृक्षलागवडीची गरज असल्याचं यावेळी म्हणाले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपणही
करण्यात आलं.
****
संत साहित्य तसंच मानवतावादी कार्यासाठी राज्य सरकारकडून
दिला जाणारा यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला
आहे. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. आषाढी
एकादशीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत या
पुरस्काराची घोषणा केली.
****
आषाढी एकादशी काल सर्वत्र भक्तीभावानं साजरी झाली. औरंगाबाद,
परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यात ठिकठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी काल
दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक शाळांमधूनही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी
पारंपरिक वेशभुषेत काल दिंड्या काढल्या. पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या पादुका तसंच
समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
हिंगोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डी
एम धनवे यांच्याकडे सुमारे ४५ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. धनवे यांच्या नांदेड इथल्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक
पथकानं काल टाकलेल्या धाडीनंतर ही बाब समोर आली. या प्रकरणी नांदेड पोलिस ठाण्यात धनवे
आणि त्यांच्या पत्नी अनुराधा धनवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनुराधा धनवे
या नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा
कारखाना श्री दांडेगावकर यांच्या ताब्यात आहे, उपाध्यक्षपदी शहाजी देसाई यांची निवड
झाली आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर जीएसटी
अंमलबजावणीनंतर आर्थिक परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारनं
अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात जीएसटी अंमलबजावणीनंतर
झालेल्या परिणामांचा आढावा घेणार आहे.
दरम्यान, जीएसटीच्या नावाखाली छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक करण्याचा
प्रकार होत असल्याचं आढळून आल्यास ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असं
आवाहन राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.
ग्राहक आपली तक्रार ग्राहक संरक्षण विभागाच्या फेसबुक
पेजवर, वैधमापन विभागाच्या dclmm_complaints@yahoo.com
या ई मेल आयडीवर, ९८ ६९ ६९ १६ ६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नोंदवू
शकतात.
****
No comments:
Post a Comment