Thursday, 6 July 2017

Text-AIR News Bulletin,Aurangabad 06072017 0650


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली. कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आता २००९ नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी शासनानं २०१२ नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाच या योजनेत समावेश केला होता. याशिवाय, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांवरील  रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

****

राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर, टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार डॉ.अनिल बोंडे, आशिष देशमुख, संजय कुटे, प्रशांत बंब यांच्यासह अन्य काही जणांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांना याबाबत  निवेदन दिलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत तूर खरेदीचं टोकन घेतलं आहे, अशा सर्वांची तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी निवेदनाद्वार केली होती. त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. मात्र, या तुरीची खरेदी करताना, ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी कर्जमाफीच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे हे चुकीचे असल्याची कबुली सहकारमंत्र्यांनीच दिल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत वर्धा जिल्ह्याचं नावच नाही, पण मुंबईत मात्र ८१३ शेतकरी असल्याचा शोध सरकारनं लावल्याचं ते म्हणाले. सरसकट कर्जमाफीची काँग्रेस पक्षाची मागणी कायम असून येत्या १० जुलै रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत कर्जमाफीची वस्तुस्थिती आणि खरी आकडेवारी जनतेपर्यंत नेऊन जनजागृती करण्याबाबतची रणनिती ठरवली जाणार आहे, त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनाची आखणी केली जाईल असंही खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

****

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांची ३०० कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागानं जप्त केली आहे. बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या रक्कमेमधून या मालमत्तांची खरेदी केली होती. नाशिक जिल्ह्यातला ८० कोटी रूपयांचा साखर कारखाना, सांताक्रूझमधलं ११ कोटी ३० लाख रूपयांचं घर, वांद्रे पश्चिममधल्या हबिब मनोर आणि फातिमा मनोर या इमारती, पनवेलमधला ८७ कोटी रुपयांचा भूखंड अशा जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता आहेत. त्यांचं मूल्य हे ३०० कोटी रूपयांपेक्षा अधिक असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

उद्योग सुरु करण्याकरता परवानग्या सहज मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या  इज ऑफ डुईंग बिझनेस धोरणाची अंमलबजावणी नगरपालिका क्षेत्रातही करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं. गृहनिर्माण- नवी दिशा या विषयावर आधारित चर्चासत्रात ते काल बोलत होते. यामुळे उद्योजकांना राज्यातल्या इतर ठिकाणीही उद्योग उभारणं सोईचं होईल, असं ते म्हणाले.

****

सरपंचांची थेट मतदानानं निवड करण्याच्या निर्णयाला  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्र ग्राम पंचायत कायद्यात यासबंधी सुधारणा करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकताच  यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी राज्यात आठ हजार ग्राम पंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं, ठाकरे म्हणाले.

****

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला दिला जावा असं मत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं आहे. या मार्गावरच्या संपादित केलेल्या जमिनीसंदर्भात जालना जिल्ह्यातल्या शेतकरी  तसंच संघर्ष  समितीनं नोंदवलेल्या आक्षेपांसंदर्भात काल खोतकर यांनी जालना इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना तसंच बदनापूर तालुक्यातल्या काही गावांमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी नुकतीच मोजणी  करण्यात आली आहे.

****

लेखकाच्या साहित्य कृतीवर प्रश्न निर्माण करणारी संस्कृती साहित्यात वाढायला हवी, असं मत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राहुल कोसंबी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं, प्रगतीशील लेखक संघातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यंदाचा, ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ कोसंबी यांच्या,‘उभं आडवं’ या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त त्यांचा हा सत्कार करण्यात आला.

****

क्रिकेट : इंग्लंड मधल्या डर्बी इथं काल महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर १६ धावांनी विजय मिळवला. विश्वचषक सामन्यात भारतीय महिला संघाचा हा सलग चौथा विजय आहे. विजयासाठी भारतानं ५० षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावां करण्याचं आव्हान श्रीलंका संघासमोर ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ २१६ धावाचं करू शकला. ७८ धावा करणाऱ्या दिप्ती शर्माला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

****

वेस्ट इंडीजमधल्या किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाचवा एकदिवसीय क्रिकेट खेळला जाणार आहे. भारत  या मालिकेत २-१ नं आघाडीवर आहे.

****

आशियायी स्नूकर चँपियनशीप स्पर्धेत भारतानं काल पाकिस्तानवर विजय मिळवून हा करंडक जिंकला. सांघिक स्पर्धेत पंकज अडवाणी यानं आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. हे त्याचं एकूण आठवं विजेतेपद आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या यात्रा अनुदान घोटाळाप्रकरणी २८ जणांना फरार घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये  माजी नगराध्यक्ष, तत्कालीन नगरसेवक तसंच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात अति महत्वाच्या व्यक्ती- व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. अशा दर्शनासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. याशिवाय अभिषेक आणि सिंहासन पुजेतच्या दरातही वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बीड तालुक्यातल्या सोनगाव इथले सहाय्यक पोलिस निरिक्षक अनंत जगताप आणि जमादार अनिल आंधळे यांना १० हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. एकाच कुटुंबातल्या दोन सदस्यांमध्ये जमिनीच्या जागेवरुन वाद झाला होता, या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी जगताप यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

****

औरंगाबाद इथल्या जीटीएल वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. एका ग्राहकाला १ लाख ५७ हजार रुपयांचं बिल कमी करुन देतो असं सांगून प्रभाकर फुले यानं ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये घेतांना त्याला अटक करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता माधव  गायकवाड यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची  पाहणी  करण्यासाठी  २००० रुपयांची  लाच घेतांना काल अटक करण्यात आली.

****

मराठवाड्यात लावण्यात आलेल्या वृक्षांची सर्वांनी ‘माय प्लांट्स ॲप’वर नोंद करावी असं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं वृक्ष लागवडीच्या अनुषंगानं घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सध्या राज्यात वृक्ष लागवड सप्ताह सुरु असून या सप्ताहात कोणी, कुठे आणि किती वृक्ष लागवड केली याची नोंद करण्यासाठी हे ॲप सुरु करण्यात आलं असून ७ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत त्यावर नोंद करता येणार असल्याची माहिती भापकर यांनी यावेळी दिली. प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून जगवावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****




No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 12 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 12 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...