Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुंबईत प्रभादेवी - परळ इथं झालेल्या चेंगराचेंगरीतल्या २२ मृतांपैकी १९ जणांची
ओळख पटली आहे. मृतांमध्ये एकूण १४ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश
आहे. जवळपास ३९ जखमींवर परळ इथं केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेमंत्री
पियूष गोयल यांनी मुंबर्इतील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करत केएर्इएम रुग्णालयात
जाऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्र्यांनी दहा लाख रुपये तर राज्यशासनातर्फे
पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना एक लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी
५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त
केला आहे. या दुर्घटनेची राज्य शासन आणि
रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्र्यांशी या
दुर्घटनेबाबत आपण चर्चा केली असून, या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचा
इशारा देत, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाला विविध उपाययोजनांसह आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल
असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल संताप
व्यक्त करत, यासाठी सरकार आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी
अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत विविध यंत्रणांचा
परस्पर समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनं मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा
निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. या विशेष नियंत्रण कक्षाच्या
माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका, आणि आपले सरकार
पोर्टलद्वारे प्राप्त माहितीवर समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे.
****
राज्यातील ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या
‘महाखादी’ या दर्जेदार ब्रॅण्डला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद
मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. ग्रामोद्योगाअंतर्गत
राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणी केलेल्या ग्रामीण कारागीर, उद्योजक यांच्या
उत्पादनांच्या मार्केटींगसाठी ‘महाखादी’ या ब्रॅण्डची आज औपचारीक घोषणा करण्यात
आली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या माती तसंच लाकडाच्या
वस्तू, खाद्य पदार्थ आणि इतर वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं
या ब्रॅण्डचा उपयोग होणार आहे.
****
भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याकडे कोणीही राजकीयदृष्टीने पहिलेलं नाही, असं
अखिल वंजारी विकास परिषदेचे ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते नाशिक
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक प्रबोधनासाठी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना समर्थन देण्याचा निर्धार अखिल वंजारी विकास परिषदेनं
केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
‘स्वच्छ भारत अभियाना’ला गती देण्यासाठी मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय
कार्यालयांनी स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावं, असं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्हा परिषद कार्यालयाला भेट
दिल्यानंतर बोलत होते. कार्यालयांना स्वच्छता राखण्यासोबतच शासकिय दस्तऐवजांचे जतन
करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले.
****
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना
दुरूस्तीला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये
एक ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. त्या आज औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. एकही मुलगी शाळाबाह्य न होऊ देण्यासह, प्रत्येक
घरी शौचालय बांधकाम, ग्रामपंचायत विकास आराखड्यात १० टक्के निधी महिलांसाठी राखीव,
आदी अनेक ठराव या महिला सभेत होणार असल्याचं, रहाटकर यांनी सांगितलं.
****
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन जम्मू काश्मीरच्या दोन
दिवसीय दौऱ्यासाठी आज श्रीनगरला पोहोचल्या. या दौऱ्यात त्या आज भारत पाकिस्तान दरम्यान,
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांना भेट देणार आहेत. उद्या चीन सीमेवर तसंच
सियाचीन इथं जाऊन त्या सैनिकांशी संवाद साधणार आहेत. सशस्त्र सेनेची सज्जता तसंच राज्याच्या
सुरक्षा व्यवस्थेचा त्या आढावा घेतील.
****
No comments:
Post a Comment