Wednesday, 20 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 20.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

संयुक्त राष्ट्र संघाच्या बहात्तराव्या वार्षिक महासभेला कालपासून न्यूयॉर्क इथे सुरुवात झाली. परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज या महासभेत येत्या शनिवारी भाषण करणार आहेत. पृथ्वी ग्रहासंदर्भातल्या आपल्या जबाबदारीची भारताला जाणीव असून, पर्यावरणबदला संदर्भात, पॅरिस कराराच्या व्याप्तीबाहेरही भारत काम करत राहणार आहे, असं प्रतिपादन स्वराज यांनी काल केलं. पुढील पिढ्यांना समृध्द पर्यावरण देण्यासाठी भारत प्रतिबध्द आहे, असं स्वराज यांनी यावेळी नमूद केलं.

****

जगातली सर्वात जास्त उंचीवरची सामरिक जागा, अशी ओळख असलेल्या सियाचीन या भागात भारतीय सैन्यानं स्वच्छ भारत अभियान हाती घेतलं आहे. वर्षभर बर्फानं आच्छादित राहणारा हा भाग स्वच्छ करण्याच्या आणि सियाचिन हिमनदीचं पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या उद्देशानं सैन्यानं हे अभियान सुरु केलं आहे.ऑक्टोबर २०१४ पासून त्रेसष्ट टनांहून जास्त कचरा या भागातून सैन्यपथकांनी खालच्या तळांवर आणला आहे.

****

देशभरातल्या दिव्यांगांना आधुनिक उपकरणं आणि इतर मदत पोहचवण्याच्या योजनेनुसार केंद्रसरकारनं गेल्या तीन वर्षात सुमारे चारशे सहासष्ट कोटी रुपये खर्च करत सात लाख साठ हजार दिव्यांगांना मदत पोहचवली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांनी ही माहिती दिली आहे. सुमारे साडेपाच हजार शिबिरांचं आयोजन करुन ही मदत पुरवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात सामान्य नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नीती आयोगानं देशातल्या सगळया राज्यांमधल्या अशा सुविधांचा आढावा घेतल्यांनंतर जाहिर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या, अरुणाचल प्रदेश तिसऱ्या तमीळनाडू चौथ्या तर गुजरात पाचव्या स्थानावर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ साठीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत येत्या २२ तारखेपर्यंत असून ,या योजनेतल्या  संभाव्य लाभार्थी असणा-या ज्या शेतक-यांनी अर्ज दाखल केले नाहीत, त्यांनी तात्काळ आपले अर्ज आपले सरकार किंवा  महा ई -सेवा, या केंद्रांमार्फत दाखल करावेत, असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.

ज्या शेतक-यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्यांनी स्वत:चे जास्तीचे अर्ज ऑनलाईन केंद्रांशी संपर्क साधून रद्द करावेत, नाहीतर असे शेतकरी कर्जमाफीस अपात्र राहतील, असं सरकारनं म्हटलं आहे.  अर्ज दाखल करताना त्यामध्ये चुका झालेल्या असल्यास त्या चुका दुरुस्त करण्याची सोय संबंधित पोर्टलवर उपलब्ध करुन दिली आहे.

****

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे . चांदोली , खडकवासला , उजनी , पानशेत , वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू करण्यात आला आहे.  सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिह्यातल्या भाटघर आणि वीर या धरणांमधून विसर्ग सुरु असल्यामुळे भीमा नदीच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे . पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणातुनही  विसर्ग सुरु करण्यात आला असून,त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा , वारणा नद्यांच्या काठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे . सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण जवळपास पूर्ण भरल्यामुळे या धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत .

****

ुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर आज सकाळी कमी झाला. या आधी दिलेला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतला असून, काही ठिकाणी मधून मधून पाऊस पडेल असा इशारा जारी केला आहे. कालपासून झालेल्या पावसाने आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विमानसेवा मात्र आज दुसऱ्या दिवशीही प्रभावित झाली आहे.

****

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची तीन खंडपीठं मुंबई,पुणे आणि नागपूर इथे पुढच्या दोन वर्षांसाठी स्थापन करण्याला  मंत्रीमंडळानं मान्यता दिली .या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणांसोबतच नव्यानं दाखल होणाऱ्या प्रकरणांचाही जलदगतीनं निपटारा होईल.

****

वाशिम जिल्ह्यात ’एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणा-या दोन हजार तीनशे एकतीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या 9 दिवसा पासून बेमुदत संपावर असल्यानं या अंगणवाड्यां मध्ये शिकणाऱ्या  अट्ठेचाळीस हजार पाचशे तेरा मुलांना पोषण आहार आणि अनौपचारिक शिक्षणा पासून वंचित राहावं लागत आहे.  जिल्ह्यातील एकशे एकतीस मध्यम कुपोषित  आणि सतरा अति कुपोषित बालकांच्या आरोग्या सह  पंधरा  हजार नऊशे ब्याएंशी गरोदर आणि स्तनदा मातांच्या सकस आहाराचा प्रश्न ही  या संपामुळे गंभीर होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



No comments: