Tuesday, 26 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२६ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टर इथं भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. याठिकाणाहून काही शस्त्र सापडली असल्याचं लष्करी अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

****

२०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केल्याची पावती देणारे व्ही व्ही पॅट मतदान यंत्र वापरण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी सांगितलं. ते सिमला इथं वार्ताहरांशी बोलत होते. या मतदान यंत्रांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारनं पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, या निधीतून २३ लाख नवी मतदान यंत्रं आणि १६ लाख व्हीव्हीपॅट यंत्रं तयार करण्यात येतील असं ते म्हणाले.

****

नांदेड लाचलुचपत विभागाच्या वतीनं काल दोन वेगवेगळ्या घटनात तीन जणांना लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेचा कनिष्ठ लिपीक संजयकुमार देशटवार आणि सेवक शेख मुनीर शेख मोहियोदीन या दोघांना दोन हजार रूपयांची लाच घेतांना पकडण्यात आलं. देशटवार यांनं तक्रारदाराच्या पत्नीच्या भविष्य निर्वाह निधीतून अडीच लाख रुपये ना परतावा रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चाचं प्रमाणपत्र देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप सोमाणी याला दोन हजार रूपयांची लाच घेतांना  पकडण्यात आलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा साडे ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, धरणाच्या डाव्या तसंच उजव्या कालव्यातून अनुक्रमे एक हजार आणि पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं.

****

अहमदनगर इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित कृषी प्रदर्शन आणि किसान आधार संमेलनाचं उद्घाटन पशुसंवनवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. हे संमेलन येत्या २९ तारखेपर्यंत चालणार आहे. उत्पादन वाढवण्यासाठी शेतीला असणारे पूरक जोडधंदे आवश्यक असल्याचं जानकर यावेळी म्हणाले.

****

No comments: