Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संशोधन क्षेत्रात
महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्ली इथं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - सीएसआयआरच्या वर्धापन दिनानिमित्त
आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्र निर्माणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची
महत्त्वाची भूमिका असून, या क्षेत्रातली असमानता दूर केली नाही, तर देशाला वैज्ञानिक
क्षेत्रात यश मिळणार नाही, असं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.
****
भारत आणि अमेरिके
दरम्यान संरक्षण भागीदारी वाढत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं
आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस भारत दौऱ्यावर आले असून, नवी दिल्ली इथं
दोन्ही नेत्यांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सीतारामन बोलत होत्या. मॅटिस यांच्यासोबत
भारताच्या सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानात
गेल्यावर दहशतवादाचा मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचं आश्वासन देत मॅटिस यांनी, दहशतवादाचा
नायनाट करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असं नमूद केलं.
****
आशियाई विकास
बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक वृद्धी दर सात टक्के राहील असा अंदाज
व्यक्त केला आहे. बँकेनं आशियाई विकास दृष्टिक्षेप २०१७ या आपल्या अहवालात एप्रिलमधल्या अंदाजाच्या तुलनेत
हा दर चार शतांश टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०१८-१९ या पुढच्या आर्थिक
वर्षासाठी हा वृद्धी दर सात पूर्णांक सहा टक्क्यांऐवजी सात पूर्णांक चार टक्के राहील
असंही बँकेनं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज दक्षिण कोरिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचं शिष्टमंडळ विविध उद्योगसमुहांशी चर्चा करणार
आहे. महत्त्वाच्या अनेक प्रकल्पांनाही मुख्यमंत्री भेट देणार असून, कोरियाच्या उद्योग-व्यापारी
जगतातल्या प्रमुख व्यक्तींशीही चर्चा करणार आहेत. राज्यातल्या विविध पायाभूत सुविधा
प्रकल्पांच्या उभारणीसह परकीय गुंतवणुकीबाबत या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
****
जपानी गुंतवणुकीला
चालना मिळावी यासाठी परवाने प्रक्रिया गतिमान करण्याकरता सर्व राज्यांनी एक खिडकी योजना
त्वरित सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकार सर्व राज्यांना देणार आहे. जपानचं अर्थव्यवहार,
व्यापार आणि उद्योग मंत्रालय तसंच परदेश व्यापार
संघटना, भारतीय राज्यांशी गुंतवणूक आणि सहकार्याबाबत थेट पाठपुरावा करणार आहे. औद्योगिक
धोरण आणि प्रोत्साहन विभागानं आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
भारतीय जनता
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबई इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांची भेट घेतली. यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा
झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि नारायण राणे यांच्या
भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
****
मालेगाव बॉम्बस्फोट
प्रकरणातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांना मुंबई उच्च न्यायालयानं आज एक लाख रुपयांच्या
जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित
यांच्यानंतर जामीन मिळणारे उपाध्याय हे पाचवे आरोपी आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी
पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती.
मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचं सांगितलं होतं.
****
मानवत तहसील
कार्यालयातले अव्वल कारकून प्रकाश बोराडे यांना जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी निलंबित
केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मानवत तहसील कार्यालयातल्या पुरवठा विभागाची तपासणी केली
असता, मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली, तसंच बोराडे यांच्याबद्दल नागरिकांच्या अनेक
तक्रारी आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली असल्याचं
जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं. या योजनेच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत
ते आज बोलत होते. एक आणि दोन ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी
सहाय्यक गावस्तरीय अर्जदार शेतकऱ्यांच्या याद्यांचे चावडी वाचन करणार आहेत. या याद्या
ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात प्रसिध्द केल्या जातील. या चावडी वाचनात शेतकऱ्यांच्याशकांचं
निरसन केलं जाईल, तसंच यादीतल्या अपात्र शेतकऱ्यांबाबत माहिती देण्याची मुभाही दिली
जाणार आहे.
****
जालना जिल्ह्यात
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दाखल अर्जांचं आज चावडी वाचन झालं. जिल्ह्यातल्या
४८५ ग्रामपंचायतींमध्ये हे वाचन झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथं
एका ब्रेनडेड तरुणाचं अवयवदान करण्यात आलं. या तरुणाचं हृदय, मूत्रपिंड आणि यकृत औरंगाबाद,
मुंबई आणि दिल्ली इथं पाठवण्यात येत आहे. यासाठी औरंगाबाद आणि मुंबईहून डॉक्टरांचं
पथक लातूर इथं दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment